रिफायनरी प्रकल्पाला नाणार येथील स्थानिकांनी विरोध केल्यानंतर हा प्रकल्प बारसू येथे हलवण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प त्या ठिकाणी होणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र, आता बारसू येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी कसा लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
बुधवार, ३० मार्च रोजी ग्रामस्थांनी एकत्र जमून या प्रकल्पाला बारसूमध्ये विरोध असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन आपला विरोध दर्शवला. बारसू मध्ये प्रकल्प नको. आमच्या वाड- वडीलांची ही जमीन आहे. आमची रोजी रोटी या जमिनीवर आहे. आंबे, काजूची झाडं आहेत. त्यातून उत्पन्न मिळत असते, असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पामुळे जमिनी जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
रत्नागिरीतील नाणार इथला प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळला होता. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. मात्र, आता सुरुवातीलाच बारसू येथील ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवल्यामुळे या प्रकल्पाचा प्रश्न कसा सुटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
हे ही वाचा:
राणा आयुब यांना विमानतळावर अडवले! १ एप्रिलला होणार ED चौकशी
आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक
मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला
सध्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, “नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळं आपण तिथून तो हलवला आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे.”