देशपातळीवर एकीकडे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा प्रयोग सुरू असताना राज्यातील विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निधी वाटपावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्र सोडलं आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली. ठरावीक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला आणि ९० टक्के आमदारांना निधीच मिळाला नाही, अशी तक्रार नाव न घेता जितेंद्र आव्हाडांनी केली. त्यांच्या बोलण्याचा रोख हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्याकडे असल्याच्या चर्चा आहेत. यावर विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर दिले आहे.
“जितेंद्र आव्हाड हे भांबावले आहेत. पागलसारखे झाले आहेत. काय बोलत आहेत ते त्यांनाच कळत नाही. आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षातील जयंत पाटील आणि राजेश टोपे यांना मिळालेल्या निधीवर बोलावं,” अशी सणसणीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये निधीमुळे धुसमूस असल्याचे उघड झाले आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील कासारवडवली गाव दुसऱ्यांदा हादरले!
भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!
कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!
उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!
“जयंत पाटील आणि राजेश टोपेंनाही पैसे मिळाले होते, त्यावर आव्हाड का बोलले नाहीत? त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप करावेत. आमच्यावर कशासाठी आरोप करता? आम्ही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत. बाकीच्यांनी जसा प्रस्ताव पाठवला, तसा आम्हीही प्रस्ताव पाठवला. सरकारला वाटलं विरोधी पक्षाला निधी द्यावा, त्यामुळे त्यांनी निधी दिला. याआधीही असंच व्हायचं, काही नेत्यांना मिळायचा. पण आम्ही मात्र दिलदार होतो. आम्ही पाच कोटी घेतले तर विरोधकांना दोन कोटी द्यायचो. पण आता विरोधी पक्षाच्या आमदारांना निधीच देत नाहीत आणि समतोल विकासाच्या गोष्टी करतात, हा ढोंगीपणा आहे. त्यामुळे आव्हाडांनी त्यांचा राग एकनाथ शिंदेंवर काढावा,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.