भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला. “महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं” असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला. इतकंच नाही तर विजय वडेट्टीवारांनी या संस्थेबाबत केलेल्या घोषणांची उत्तरं द्यावीत अन्यथा राजीनामा द्यावा, अशी मागणीही पडळकर यांनी केली.
लोकसंखेने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचं राजकारणं केलं. या समाजासाठी त्यांनी काहीही केलं तर नाहीच ऊलट काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात वसंतरावनाईक भटके विमुक्त महामंडळ तर यांनी दाखवायलाही ठेवलं नव्हतं.
यासर्वांवर उपाय म्हणून मा. देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना करून तातडीने ३८० कोटींचा निधीही मंजूर केला. पण आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं आहे, असा आरोप पडळकरांनी केला.
१० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, यूपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्च शिक्षणासाठी ३१ हजाराची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, नीट-सीईटीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देऊ, यूपीएससीच्या मुख्य परीक्षा पास झालेल्यांना दिल्ली मुलाखतीसाठी २५ हजार देऊ, नाशिक-औरंगाबादमध्ये उपविभागीय कार्यालय उभारू, महाज्योतीच्या स्वतंत्र कार्यालयासाठी ६० लाख रू देऊ. इतकेच नाहीतर गाजावाजा करून महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला त्यातले ३५ कोटी पण खर्च करता आले नाही.
हे ही वाचा:
मुंबईत दंड वसुलीसाठी आता ‘ही’ नवी मोहीम
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार
म्हणजे वड्डेटीवारांनी या घोषणांच्या नावाखाली आपल्या तोंडाची फक्त वाफ केली. तरीही प्रसिद्धीसाठी २ कोटी रूपये का खर्च केले? या प्रश्नांची उत्तर ‘घोषणाबहाद्दर ‘ वड्डेटीवारांनी द्यावीत नाहीतर नाहीतर राजीनामा द्यावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.