विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा घाना दौरा स्थगित केला आहे. ६६व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ते शनिवारी घानासाठी निघणार होते. परंतु महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित असताना नार्वेकर घानाला जाणार असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
विरोधकांच्या टीकास्त्रमुळे त्यांनी हा दौरा रद्द केला, असे बोलले जात आहे. मात्र विधिमंडळ अधिकाऱ्यांनी या संदर्भात वेगळेच स्पष्टीकरण दिले आहे. ‘हा दौरा या आठवड्याच्या सुरुवातीलाच रद्द केला असल्याचे कळवण्यात आले होते. या दौऱ्याचा आणि आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीचा कोणताही संबंध नाही. कारण आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी आता १३ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे या दौऱ्यामुळे सुनावणीला उशीर झाला नसता,’ असे स्पष्टीकरण सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
घाना संसद आणि राष्ट्रकुल संसदीय परिषदेने ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत या परिषदेचे आयोजन केले होते.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या मूळ शिष्टमंडळात आदी राहुल नार्वेकर यांचा समावेश नव्हता. मात्र आमदार अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होण्यासाठी नार्वेकर यांचा समावेश आयत्यावेळी करण्यात आला, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आदित्य ठाकरे यांनीही नार्वेकर यांच्या सहभागाबद्दल टीका केली होती.
हे ही वाचा:
‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक
न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप
आशियाई स्पर्धेत नेमबाजांची रौप्य पदकाला गवसणी
लालबागच्या राजाला नवस करू दिला नाही, म्हणून तिने केले मुलाचे अपहरण
आमदार अपात्रतेवरील सुनावणी पुढे ढकलणाऱ्या विधानसभाध्यक्षांचा लोकशाही बळकट करण्यासाठी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात समावेश होणे, हा विनोद आहे,’ अशी टीका त्यांनी केली. होती. ‘त्यांनी लोकशाहीची, राज्यघटनेची हत्या केली आहे आणि ते घाना येथे लोकशाहीवर भाषण देण्यासाठी जात आहेत. येथे ते सुनावणीसाठी तारखांवर तारखा देत आहेत,’ अशी टीका राऊत यांनी केली होती.