बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या भारतात दाखल झाल्या. त्या सगळ्या घडामोडींवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत भूमिका मांडली. ते म्हणाले की, शेख हसिना यांनी भारत सरकारला विनंती केली की, त्यांना भारतात यायचे आहे. अगदी कमी वेळ राहिलेला असताना त्यांनी ही विनंती केली.
जयशंकर म्हणाले की, आम्हाला असे वाटते की, बांगलादेशातील सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्या दिल्लीत संध्याकाळी दाखल झाल्या.
गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर शेख हसिना यांचे विमान उतरण्यापूर्वी बांगलादेशातील संबंधित संस्थांकडून विमानमार्ग अडथळामुक्त करण्याची विनंती करण्यात आली होती. जयशंकर म्हणाले, बांगलादेशातील भारतीयांच्या आपण संपर्कात असून त्यांच्या सुरक्षेविषयी सर्व काळजी घेतली जात आहे. बांगलादेशमध्ये १९ हजार भारतीय असून ९ हजार हे विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी हे जुलैमध्येच भारतात परतले आहेत. तेथे असलेल्या अल्पसंख्यांकाबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत.
हे ही वाचा:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !
बांगलादेशमध्ये आंदोलकांनी तुरुंग पेटवताचं ५०० कैद्यांसह अनेक दहशतवादी पळाले
विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक, दणदणीत सामना जिंकला !
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत प्रचंड आंदोलने झाली. ती एवढी हिंसक बनली की, त्याठिकाणी झालेल्या संघर्षातून ३०० लोक मृत्युमुखी पडले. त्यात हसिना यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. अखेर या आंदोलकांपुढे हसिना यांनी हार मानली आणि त्यांनी सरकारी निवासस्थान सोडून भारतात आश्रय घेतला. या आंदोलकांनी नंतर हसिना यांचे सरकारी निवासस्थान ताब्यात घेतले आणि तिथे प्रचंड लुटालूट केली.