स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पर्मनंट भारतरत्न आहेत त्यांचा अपमान करू नका असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गुरुवार, २ डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधाना बाबत फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे. या प्रकरणात निलंबित खासदारांनी माफी मागावी अशी मागणी सरकारमार्फत करण्यात आली. पण यावर माफी मागायला आम्ही सावरकर नाही असे उत्तर देण्यात आले आहे. यावरून प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज
ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!
…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते
ममता बॅनर्जींचे स्वागत आणि भाजपचे मुख्यमंत्री आले तर टीका
यावरच प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, “शिवसेनेचे बेगडी सावरकर प्रेम आता पूर्ण उघड झाले आहे. आत्तापर्यंत त्यांच्या मित्र पक्षाचे लोक सर्रास सावरकरांना शिव्या द्यायचे, पण आता त्यांच्या पक्षातले त्यांचे खासदार असं बोलतायंत. तुम्हाला सावरकरांचा सन्मान करायचा नाही. रोज सकाळी उठून म्हणायचं कि सावरकरांना भारतरत्न दिला जात नाही, मी तर म्हणतो सावरकर हे पर्मनंट भारतरत्न आहेत. पण किमान त्यांचा अपमान तरी करू नका. हे रोजचे झाले आहे. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा केला जात अपमान आहे. पण जनतेलाही आता त्यांचे हे बेगडी प्रेम लक्षात येत आहे आणि जनतेला हे मान्य नाही”