25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणवाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

Google News Follow

Related

नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणी, बलात्कार, ब्लॅकमेलिंग असे अनेक गुन्हे असलेल्या आणि सचिन वाझेचा साथीदार असलेल्या गावडेची अटक आता अटळ आहे. बेकायदा बांधकामांना लक्ष्य करून गावडेने वसई-विरार पट्ट्यातील बिल्डरामध्ये दहशत निर्माण केली होती. गावडेच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात खंडणी, बलात्कार, फसवणूक आदी ८ गुन्हे दाखल होते. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी त्याने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु तिथे डाळ न शिजल्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने बाजू न मांडल्याचा मुद्दा गावडेच्या वकिलाने उपस्थित केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक महिन्याची सवलत दिली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने गावडेवर असलेल्या गंभीर आरोपांची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
त्याला १५ दिवसात पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले. या निकालामुळे नालासोपाऱ्याचा शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि विरारमधील कुख्यात वसूली माफीया धनंजय गावडे याला जबरदस्त दणका बसला आहे. आता अटकेशिवाय पर्याय उरलेला नाही.
वसई-विरारमध्ये अनधिकृत इमारतींची संख्या खूप मोठी आहे. अशा इमारती हेरून बिल्डरांना ब्लॅकमेल करण्याचे सत्र गावडेने सुरू केले होते. छोट्यामोठ्या बिल्डरांकडून त्याने कोट्यवधींची वसूली केली होती. वसई-विरार परीसरात दबदबा असलेल्या भाई ठाकूरच्या संरक्षण कवचात असलेले बिल्डरही यातून सुटले नाहीत.
धनंजय गावडेचा दरारा एवढा होता की मोठ्या प्रमाणात वसूली करून सुद्धा त्याच्याविरोधात एकही एफआयआर नव्हता. २०१६ पासून त्याच्या गुन्हेगारी साम्राज्याची पडझड सुरू झाली. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात नालासोपाऱ्यात त्याच्या कारमध्ये सुमारे एक कोटी रुपयांची रोकड सापडली. नुकत्यात झालेल्या नोटबंदीनंतर गावडेच्या कारमध्ये सापडलेल्या कोऱ्या नव्या नोटांमुळे आय़कर विभागातले अधिकारीही चकीत झाले होते.
२०१७ मध्ये गावडेच्या विरोधात फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. एका बिल्डरने नालासोपारा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लोकांची भीड चेपली आणि अनेक बिल्डर त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी पुढे आले. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला. यानंतर गावडे चांगलाच गळपटला, अटक टाळण्यासाठी तो आपलं घरदार, कारखाना सोडून फरार झाला. त्यानंतर तो गेली तीन वर्षे अज्ञातवासात होता. वसई-विरारमध्ये त्याच्या कारनाम्यांची चर्चा फक्त मागे उरली. त्याला दिल्लीत, नेपाळमध्ये पाहील्याचे लोक सांगत.
जामीनासाठी त्याने कोर्टात प्रदीर्घ लढाई लढली. सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. सगळी प्रकरण मिटवण्याचा त्याला इतका विश्वास होता की त्याने परत येण्याची जोरदार जाहीरातबाजी सुरू केली होती. त्याचा फोटो आणि मी परत येतोय असे वाक्य लिहिलेले केक बॅनर वसई-विरार पट्ट्यात दिसू लागले होते.
याच दरम्यान, ठाण्यातील रहीवासी मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एपीआय सचिन वाझे याच्यासोबत गावडेचा हात असल्याचा आरोप केला. मनसुखच्या फोनचे शेवटचे लोकेशन गावडेच्या वसईतील घराच्या जवळपास होते असा फडणवीसांचा दावा होता. २०१८ मध्ये दाखल झालेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात वाझेसोबत गावडे आरोपी होता. फडणवीसांनी जाहीर केलेल्या या तपशीलामुळे गावडेची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली. त्याच्या कारनाम्यात वाझे सामील असल्याची माहिती समोर आली. या आरोपांमुळे गावडे चांगलाच हादरला. विडिओ जारी करून त्याने याप्रकरणी सफाई देण्याचा प्रयत्न केला. आपला मनसुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट करून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांच्या अज्ञातवासानंतर वसई-विरारमध्ये परत येण्यासाठी गावडे प्रचंड उत्सुक होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे तुर्तास त्याच्या योजनेवर पाणी पडले आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा