सचिन वझेची अखेर पोलिस दलातून हकालपट्टी

सचिन वझेची अखेर पोलिस दलातून हकालपट्टी

अंबांनीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी तसेच हिरेन प्रकरणातील आरोपी

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेला प्रमुख आरोपी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन हिंदुराव वझेला अखेर पोलिस दलातून उशिरा का होईना बडतर्फ करण्यात आले आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सचिन वझेला बडतर्फ केल्याचे आदेश मंगळवारी दिले. भारतीय संविधान ३११ (२) (ब)मधील कलमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातच वझेच्या बडतर्फीची प्रक्रिया मुंबई पोलिसांनी सुरू केली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?

मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू

राजभवनाच्या लॉनवरून मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलवणार

काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा

याच सचिन वझेला महाविकास आघाडीच्या कार्यकाळात पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. त्याआधी, तो निलंबित होता. शिवाय, अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यातही वझेच आघाडीवर होता.

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वझेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझीचीही चौकशी सुरू असून सध्या वझे तळोजा तुरुंगात आहे. मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी सुनील मानेदेखील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. काझी आणि वझे यांच्या चौकशीतून मानेचे नाव पुढे आले होते. अँटिलिया स्फोटकप्रकरणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी हिरेन यांच्यावर दबाव आणण्याचे काम मानेने केल्याचे सूत्रांते म्हणणे आहे.

२५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या प्रशस्त घराबाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यात धमकीचे पत्रही होते.  त्यानंतर ज्या कारमध्ये ही स्फोटके सापडली त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला कळव्याच्या खाडीत सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांचे तेव्हा म्हणणे होते पण त्यांच्या पत्नीने हा खून असल्याचा दावा केला होता तसेच ही कार नोव्हेंबरपासून सचिन वझे वापरत असल्याचा आरोप केला होता.

Exit mobile version