महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. गेला आठवडाभर येणारे रूग्णसंख्येचे आकडे खूपच बोलके आणि चिंता वाढवणारे आहेत. एकीकडे नियम आणि निर्बंध पुन्हा कडक करण्याची पाऊले प्रशासन उचलताना दिसत आहे. राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागतो का काय या चिंतेन प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ग्रासले आहे. महाराष्ट्राच्या याच भिषण परिस्थितीवरची एक ‘चिंतन बैठक’ शनिवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या चांदणी लाॅन्सवर पार पडणार आहे आणि तिही दस्तुरखुद्द शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत. या ‘चिंतन बैठकीला’ राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात, ‘दाऊदचा कर्दनकाळ’ असलेले संजय राऊत, जातीनिर्मुलनासाठी झटणारे जितेंद्र आव्हाड, महिला सबलीकरणासाठी कार्यरत असणारे धनंजय मुंडे, ‘आदर्श पत्रकार’ विजय चोरमारे,राजु परूळेकर अशी अनेक ज्येष्ठ,श्रेष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहेत. या चिंतन बैठकीचे नाव आहे ‘वशाटोत्सव’.
अनेकांना प्रश्न पडू शकतो की वशाटोत्सव चिंतन बैठक कशी? तर त्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे या कार्यक्रमाला मिळालेली परवानगी. जिथे राज्यात निर्बंध कडक करून त्याचे काटेकोर पालन करण्याची स्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी किल्ले शिवनेरीवर जमावबंदी लावली जाते. कोकणातील सुप्रसिद्ध आंगणेवाडीच्या उत्सवाला परवानगी मिळत नाही. सातारच्या प्रसिद्ध मांढरदेवीच्या यात्रेला परवानगी न देता काळूबाईचे मंदिर महिनाभर बंद ठेवले जाते. पण वशाटोत्सवाला मात्र परवानगी मिळते. हे शक्य होते पवार साहेबांच्या धोरणामुळेच आणि कोविड चिंतनाच्या ‘उदात्त’ हेतूमुळेच.
हे ही वाचा:
मला ही चिंतन बैठक वाटते कारण या वशाटोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावणाऱ्यांची यादी. ही नावे वाचता समर्थ रामदास स्वामींनंतर विश्वाची चिंता करणारे हेच लोकं आहेत आणि त्यात त्यांचे नेतृत्व दस्तुरखुद्द पवार साहेब करत असल्यामुळे त्यांच्या ‘वैश्विक’ हेतूबद्दल खात्रीच पटते. त्यात पवार साहेबांसाठी बोकड आणि चिंतन बैठक हे दोन्ही विषय अत्यंत जिव्हाळ्याचे!
गेल्या वर्षी जेव्हा संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन सुरू होता आणि महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत आघाडीवर होता तेव्हादेखील शरद पवार साहेबांनी बकरी ईदच्या निमित्ताने एक चिंतन बैठक बोलावली होती. यात राज्याचे काही महत्वाचे मंत्री आणि प्रशासनातील काही महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. फक्त राज्यसभेचे खासदार आणि एका राजकीय पक्षाचे प्रमुख या व्यतिरिक्त कोणतेही शासकीय पद नसताना पवार साहेब कोणत्या अधिकाराने अशा बैठका बोलावतात असा प्रश्न काहींना पडू शकतो नव्हे नव्हे तो पडलाच. पण असे विचारणाऱ्यांना पवार साहेबांचा ‘स्वच्छ’,’निर्म॓ळ’ हेतू समजला नाही.
पुरोगामी महाराष्ट्रातील विचारमंथनासाठी पवार साहेब कायमच आग्रही असतात. मग ते व्यासपीठ साहित्य संमेलनाचे असो अथवा वशाटोत्सवाचे. त्यात महाराष्ट्राच्या विचारमंथनात वशाटोत्सवाचे एक वेगळेच स्थान आहे आणि ते ही पहिल्या वर्षापासूनच. मला कळलेल्या माहितीनुसार पहिल्या वशाटोत्सवाला दस्तुरखुद्द निखील वागळे यांनी उपस्थिती लावली होती म्हणे. यावर आता काही जण म्हणतील की सगळ्या वाहिन्यांनी नारळ दिल्यामुळे वागळेंकडे असल्या कार्यक्रमांना हजेरी लावायला बराच फावला वेळ आहे. पण तसं नाहीये, जर निखिल वागळेंनी पहिल्या वशाटोत्सवाला उपस्थिती लावली असेल तर ती केवळ आणि केवळ अभिव्यक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठीच. वागळेंपासून सुरू झालेला हा प्रवास आता थेट पवार साहेबांच्या उपस्थितीपर्यंत आला आहे. हे वशाटोत्सवाचे यशच म्हणावे लागेल. यात आयोजकांसोबतच उपस्थित राहणाऱ्यांचे योगदान खूप मोलाचे आहे. म्हणजे वशाटच्या नावावर पिठलं भाकरी खायला लागूनही त्यांनी या महोत्सवावरचं आपलं प्रेम तसंच ठेवलं हे खरंच कौतुकास्पद आहे. या निष्ठेची तुलना फक्त आणि फक्त शरद पवारांच्या खुर्चीप्रती असलेल्या निष्ठेशीच होऊ शकते. यावरूनही आपल्या लक्षात येऊ शकतं की वशाटोत्सव आणि शरद पवार हे समिकरण किती योग्य आहे ते.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, ‘महाराष्ट्र कोविड १९ कंट्रोल रूम’ सक्रिय नाही
आज महाराष्ट्रात वीज बीलाने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे, महिलांवरचे अत्याचार वाढत चालले आहेत, राज्य सरकारच्या मोगलाई कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहेत, सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होत आहेत, सोबतीला कोविड आहेच पण तरिही या सगळ्या ‘शुल्लक’ गोष्टींवर न बोलता वशाटोत्सवात हजेरी लावण्याचे महत्व पवार साहेब जाणतात आणि म्हणूनच ते ‘जाणते’ म्हणवले जातात. माझ्यामते ही बाब वशाटोत्सवाचे महत्व अधोरेखीत करायला पुरेशी आहे.
एकुणच काय तर वशाटोत्सवाची दैदिप्यमान परंपरा आणि उपस्थितांची नावे बघता येणाऱ्या २० तारखेला पुण्यातल्या चांदणी लाॅन्सवर एक वेगळीच ‘सकारात्मक ऊर्जा’ आणि ‘ऑरा’ तयार होणार आहे. या होऊ घातलेल्या वातावरणाचा धसका कोरोनाने आधीपासूनच घेतला आहे. त्यामुळे कोरोना तिथे फिरकण्याची सुतरामही शक्यता नाही. आयोजकांनाही याची खात्री असल्यामुळे त्यांनीही कार्यक्रम पत्रिकेत कोविड खबरदारीचा साधा उल्लेख करायचीही तसदी घेतलेली नाही. जर याही पलिकडे कोरोना तिथे घुसलाच तर त्याचा मृत्यु अटळ आहे आणि त्यातूनही वाचलाच तर त्याला कार्यक्रम बदनामीचा ‘मनुवादी कावा’ असे जाहीर करण्यात येईल.