महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजी मारली असून त्यांना ४४३ मते मिळाली आहेत. भाजप विरुद्ध शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे लढतीमध्ये होते. शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली आहेत.
अकोला- वाशिम- बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. तर, शिवसेना- महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास ८० मते फुटली असल्याचे समोर आले आहे तर, त्याशिवाय ३१ मते अवैध ठरली. तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल यशस्वी ठरले आहेत. बाजोरिया यांचा पराभव हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
नागपूरच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजी
श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार; दोन पोलीस शहीद
श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या
गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूरमध्येही भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली असून मोठा विजय प्राप्त केला. यापूर्वी धुळे- नंदुरबारमधून भाजपचे अंबरीश पटेल हे बिनविरोध निवडून आले होते. तर मुंबईच्या स्थानिक प्राधिकरण जागेवरील भाजपचे उमेदवार राजहंस सिंह हेही बिनविरोध विधान परिषदेवर गेले. विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या सहा पैकी चार जागांवर भाजपने बाजी मारली आहे, तर प्रत्येकी एका जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कोल्हापुरातून काँग्रेसचे उमेदवार, शिवसेनेचे सुनील शिंदे हे मुंबईतून बिनविरोध निवडून आले. ज्या दोन जागांवर मतदान झाले, तेथे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकजूट असतानाही भाजपला यश मिळाले.