एल्गार परिषदेतील सहभागाबद्दल २०१८ मध्ये अटक करण्यात आलेले ‘शहरी नक्षलवादी’ वरवरा राव यांना अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिन दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सहा महिन्यांच्या मुदतीसाठी अंतरिम जामिन देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांना मुंबईतच राहण्यासोबत, पोलिस तपासकार्यासाठी बोलवतील तेव्हा उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. न्यायमुर्ती एस एस शिंदे आणि न्यायमुर्ती मनिष पितळे यांनी हे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच उच्च न्यायालयाने वरवरा राव यांची नानावटी रुग्णालयातून मुक्तता करण्याचे देखील आदेश दिले आहेत; ज्या ठिकाणी त्यांच्यावर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येत होते.
राव यांना २०१८ मध्ये भीमा कोरेगाव प्रकरणात इतर नऊ जणांसह पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले होते. कोरोना महामारीच्या उद्रेकानंतर त्याचा गैरफायदा घेत तब्येतीच्या कारणावरून जामिन मागितल्याचा एनआयएने त्यांच्यावर आरोप केला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने वरवरा राव यांना तळोजा कारगृहातून नानावटी रुग्णालयात हलविले होते. राव यांच्या पत्नीने आरोग्याच्या कारणावरून, त्यांना तळोजा कारागृहातून दुसरीकडे हलवावे यासाठी केलेल्या याचिकेवर सुनवणी घेताना न्यायमुर्ती एस एस शिंदे आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांनी हा निर्णय दिला होता.