आगामी लोकसभा निवडणूक अगदीच तोंडावर आलेली असताना अद्याप राज्यामध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांनी जागा वाटपावर तोडगा काढलेला नाही. मात्र, जागावाटप होण्यापूर्वीच ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आपल्या काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या दोन पक्षांनी उमेदवारांच्या नावाची परस्पर घोषणा केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान देण्यात आले असून जागा घोषित करताना त्यांना विचारत नसल्याचे वंचितने म्हटलं आहे.
“महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहे. प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे मान्य आहे का? सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत? तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात. पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा. आम्हाला आशा आहे की, वरील मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल. आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत,” अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक आहे.
प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का?
काल सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम… pic.twitter.com/6mbSC7XAab
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 10, 2024
ठाकरे गट आणि पवार गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अजून सुरू असतानाच ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतील उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेते संजय निरुपम हेही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
बजरंग पुनिया, रवी दाहिया पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर?
शाहजहान शेखवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
क्रिस्टिना पिस्कोव्हाने पटकावला ‘मिस वर्ल्ड २०२४’चा खिताब!
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि युवा सेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत, तेथेही खासदार ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंची उमदेवारी घोषित केली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचं अद्याप जागावाटप झालं नाही, तरीही उमेदवारी घोषित होत असल्याने वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे बोलले जात आहे.