वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. अनेकदा वंचित आणि मविआमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर देखील आले होते. अखेर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकला चलो चा नारा दिलेला आहे. त्यामुळे मविआ आणि वंचित यांची युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय त्यांनी राज्यातील काही जागांवर आपले उमेदवार देखील जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी त्यांनी काही जागांची मागणी केली होती. त्यांनी काही बैठकांनाही उपस्थिती लावली होती. मात्र, मविआकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता, असे त्यांनी वारंवार बोलूनही दाखवले होते.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल. जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या संघटनेसोबत आम्ही सहयोग करणार आहोत. त्यांनी ३० तारखेपर्यंत थांबा असं सांगितलं आहे.

हे ही वाचा:

ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन

वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा करत काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना वंचितकडून पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, गडचिरोलीमधून हितेश मडवी यांना उमेदवारी मिळाली आहे. अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे यांना तिकीट मिळालं आहे. तर, खेमसिंग पवार हे यवतमाळमधून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

Exit mobile version