स्थापनेपासून मराठी-अमराठीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने आता मुंबईतील गुजराती मतांवर डोळा ठेवत नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेतर्फे जोगेश्वरीमध्ये गुजराती समाजाचा विशेष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणाही देण्यात आली आहे.
या मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे संघटक असलेल्या हेमराज शहा यांनी केले आहे. २०२२ साली महाराष्ट्रात मुंबई सह १० महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांमध्ये गुजराती समाजाची मते महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे गुजराती मातांना जवळ करण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. या मेळाव्याच्या प्रसिद्धीपत्रकात येणाऱ्या महापालिका निवडणूक खूप वेगळ्या परिस्थितीत होणार असल्याचे म्हंटले आहे. “संकुचित मानसिकतेच्या भाजपा कडून उद्धव ठाकरे यांनी सत्ता हिसकावून घेतली. उद्धव ठाकरे आम्हा मुंबईकरांची प्रतिष्ठा जपत ‘सर्वधर्म समभाव’ चे राजकारण करतात” असेही या पत्रात म्हटले आहे.
या आधी केले होते ‘केम छो वरळी’
या आधी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचे गुजराती प्रेम असेच उफाळून आले होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात ‘केम छो वरळी’ चे बॅनर बघायला मिळाले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून अनेकदा मराठी-गुजराती असे भेदभाव करणारे लिखाण वाचायला मिळते. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, बुलेट ट्रेनच्या मार्गावरून टीका, मुंबईतले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करणारी शिवसेना निवडणूक आल्यावार मात्र गुजराती मतांना आपलसं करायला बघते. त्यामुळे एरवी ‘सामना’ मधुन गुजराती समाजाला शाब्दिक ‘झापडा’ देणारे आता ‘फाफडा’ आणि ‘आपडा’ करू लागल्येत अशी चर्चा सुरु झाली आहे. फक्त निवडणूक आल्यावर सेनेला गुजराती समाज आठवतो का? असा सवालही विचारला जात आहे!