उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आज आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. उत्तराखंडमध्ये आमदारांच्या नाराजीमुळे त्रिवेंद्रसिंग रावत यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
उत्तराखंडमध्ये २०१७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले होते. उत्तराखंड विधानसभेच्या ७० पैकी ५७ जागांवर भाजपाला विजय मिळाला होता. तत्कालीन सत्ताधारी पक्षाला निवडणुकांनंतर केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले होते. चर्चेत नसलेल्या नावाची निवड मुख्यमंत्री पदासाठी करण्यात आली, जी २०१४ नंतरच्या भाजपाची शैली राहिली आहे. त्यामुळे त्रिवेंद्र सिंग रावत हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले.
हे ही वाचा:
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात भाजपाला कधीही निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला नाही. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही भाजपाला मोठे यश मिळाले. लोकसभेच्या पाच पैकी पाच जागा तर भाजपाने जिंकल्याच, पण विधानसभेतील ७० पैकी ६५ जागांवरही भाजपा आघाडीवर होती. काँग्रेस पक्ष केवळ ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर राहिला होता. मतांच्या टक्केवारीत देखील भाजपा ६१% तर काँग्रेस ३१% ही स्थिती होती.
या पार्श्वभूमीवर २०२२ च्या मार्च महिन्यात उत्तराखंडमधेही निवडणुका होणार असल्यामुळे एक वर्ष केवळ बाकी असताना मुख्यमंत्री का बदलण्यात आला हे अजूनही गूढच राहिले आहे.