राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना कार्यालयात फोन घेताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावं लागणार आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भातील औपचारिक सरकारी आदेश १८ ऑगस्टपर्यंत देण्यात येतील, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर केले. या खाते वाटपात सुधीर मुनगंटीवार यांना वने आणि सांस्कृतिक विभागाचे खाते देण्यात आले आहे. नवीन खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुनगंटीवार लगेच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना झाला. मात्र, या सरकारकडे अडीच वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर २०२४ ला लोकसभा निवडणुका होणार आहेत. आपल्याकडे आता अडीच वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात पाच वर्षांची काम करायची आहेत, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिला होता. त्यानुसार खाते वाटप जाहीर होताच मुनगंटीवार सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे.
हे ही वाचा:
७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलकडून खास डूडल
बोलण्यातून, वागण्यातून महिलांचा अपमान करू नका
गांधीजी, डॉ. आंबेडकर, सावरकर, सुभाषबाबूंचा त्याग विसरता येणार नाही
गुलामीचा अंश मिटवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले पाच संकल्प
नियम अनिवार्य असेल
आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी फोनवर ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणावे असे मला वाटते,’ असे ते म्हणाले. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांना नवीन नियम अनिवार्य करणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.