कालपासून शेतकऱ्यांना आपला पाठिंब दर्शवण्यासाठी जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींमध्ये अहमहमिका लागली होती. त्याविरूद्ध भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन हॅशटॅग प्रसिद्ध केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटीसुद्ध या युद्धात उतरले. त्यामुळे समाजमाध्यमांना काही काळ आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. आता बायडन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेनेदेखील या रिंगणात भारताच्या बाजूने उडी घेतली आहे.
भारताने पारित केलेल्या शेतकरी सुधारणा विधेयकांना भारताच्या बाजारपेठेत क्रांतीकारक बदल आणू शकणारे म्हणत अमेरिकेने या कायद्यांची पाठराखण केली आहे. या कायद्यांमुळे भारतीय कृषी बाजारपेठेत खाजगी उद्योजकांना गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन मिळेल असेही अमेरिकेने म्हटले आहे.
भारतातील शेती सुधारणा विधेयकांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाविषया बोलताना स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की शांततामय मार्गाने होणारी निदर्शने हे सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे. त्याबरोबर ते हे देखील म्हणाले की दोन्ही पक्षांनी या प्रश्नावर शांततेतून तोडगा काढावा.
“संवादातून दोन्ही पक्षांमध्ये तोडगा काढण्याला आमचा कायमच पाठिंबा आहे. थोडक्यात, भारतीय बाजारपेठेची कार्यक्षमता वाढवू शकणाऱ्या आणि खाजगी उद्योजकांना आकर्षित करू शकणाऱ्या बदलांचे आम्ही स्वागत करतो” असे अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने तथाकथित शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे भयंकर हिंसाचारात देखील रुपांतर झाले होते. याबाबत संवादातून तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. २२ जानेवारी रोजी सरकार आणि आंदोलकांच्यात चर्चेची अकरावी फेरी पार पडली.