आता यूपीए नाही ‘इंडिया’

बेंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर नाव जाहीर

आता यूपीए नाही ‘इंडिया’

केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून विरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून त्यांची पहिली बैठक पाटणा येथे पार पडल्यानंतर दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली असून नावावर शिक्कामोर्तब देखील करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरुद्ध एकत्र आलेल्या २६ विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीनंतर हे नाव जाहीर करण्यात आले.

विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवण्याचा प्रस्ताव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडला. त्यानंतर इतर पक्षांनी इंडिया म्हणजेच “इंडियन नॅशनल डेमॉक्रटिक इनक्लुसीव्ह अलायन्स” (भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी) या नावाला अनुमोदन दिले. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आदी नेत्यांनी आपली मते मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत बोलताना ‘सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू’ असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे यांनी सांगितले. आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचे रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे. तसेच राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत. मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नाहीत, असे खरगेंनी स्पष्ट केले. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, “ही एक चांगली आणि अर्थपूर्ण बैठक आहे. या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो.”

राष्ट्रीय जनता दलचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव म्हणाले की, “देश आणि लोकशाही वाचवायची आहे. गरीब, तरुण, शेतकरी, अल्पसंख्याकांचं रक्षण करायचं आहे. मोदी सरकारमध्ये सगळ्यांनाच चिरडलं जात आहे.” तर, अरविंद केजरीवाल म्हणाले की, “पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास प्रत्येक क्षेत्राला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे आणि आता त्यांच्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे.”

हे ही वाचा:

उपसभापतींना अपात्र ठरवताच येत नाही!

जम्मू- काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार 

विरोधकांच्या ‘इंडिया’ची पुढची बैठक महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबईत होणार आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली असून यात त्यांनी ३० पक्षांना बोलावलं आहे. ही बैठक दिल्लीत होत आहे.

Exit mobile version