भडकाऊ भाषण केल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांची आमदारकी रद्द झाली आहे. शुक्रवारी ८ ऑक्टोबरला ही आमदारकी रद्द करण्याचा निर्णय झाला.
उत्तर प्रदेशमध्ये विशेष एमपी एमएलए न्यायालयाने आझम खान यांच्यासह तिघांना दोषी धरण्यात आले होते. भडकावणारे भाषण केल्याबद्दल ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आली. त्यात आझम खान यांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवाय, २ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत ज्या व्यक्तीला दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक काळाची शिक्षा होईल, त्याला लोकप्रतिनिधी म्हणून अपात्र ठरविण्याचा कायदा आहे. त्याला दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्या तारखेपासून त्याला सहा वर्षांसाठी त्या पदावरून दूर करण्यात येते. यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष स्वतःहून प्रक्रिया राबवू शकतात किंवा त्यांच्याकडे कुणी तक्रार केली तर त्यानुसार ते कारवाई करू शकतात.
हे ही वाचा:
‘एअरबस टाटा’ प्रकरणात भाजपाकडून मोठा खुलासा
पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’
समर्थांच्या मूर्ती सापडल्या, दोघांना अटक
आझम खान यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्यांना अपात्र करा अशी मागणी केली होती. आखन सक्सेना या भाजपाच्या नेत्याने मुख्य निवडणूक आयुक्तांनाही पत्र लिहून आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. पण राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी ही कारवाई करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो, असे स्पष्टीकरण दिल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी ही कारवाई केली. त्यासंदर्भात जे निवेदन त्यांनी सादर केले त्यात समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांना अपात्र करण्यात आल्याचे म्हटले आहे.
२०१९मध्ये आझम खान यांनी रामपूरमध्ये भाजपा नेत्यांना गुन्हेगार म्हटले होते. शिवाय, पंतप्रधान मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सूड उगवा असे आवाहनही केले होते. भाजपाच्या सत्ताकाळात मुस्लिमांना २०१४ ते २०१९ या कालावधीत खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुस्लिमांनी सूड घ्यावा असे आझम खान म्हणाले होते.