मशिदींवरचे अनधिकृत भोंगे हे कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. वेळोवेळी न्यायालयामार्फतही या बेकायदेशीर भोंग्यांविरोधात निकाल देण्यात आला आहे. तरीही ह्या भोंग्यांचा आवाज कमी होताना दिसत नाही. या भोंग्यांविरोधात आजवर अनेकांनी आवाज उठवला असून यात आता उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याची भर पडली आहे. भोंग्यांच्या या आवाजामुळे आपल्याला काम करताना व्यत्यय येत असल्याची तक्रार उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यानी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
उत्तर प्रदेश सरकारचे संसदीय कामकाज राज्य मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी मशिदीवरील अनिधकृत भोंग्यांच्या आवाजामुळे कामात व्यत्यय येतो अशी तक्रार केली आहे. आनंद यांनी यासंदर्भात बालिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. कोर्टाच्या निकालानुसार मशिदींवरील भोंग्यांचा आवाजावर निर्बंध घातले जावेत अशी मागणी या पत्रात केली आहे.
मशिदीत रोज पाच वेळा नमाज केला जातो. हा नमाज सकाळपासून रात्रीपर्यंत थोड्या थोड्या अंतराने असतो. या आवाजामुळे मला योग, ध्यान, पूजा आणि सरकारी कामकाज करण्यात व्यत्यय येतो. नमाजाच्या या आवाजामुळे आसपासच्या शाळेतील वियार्थ्यांना अभ्यासातही व्यत्यय येतो असे शुक्ला यांच्या पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये अजून एका भाजपा कार्यकर्त्याला फासावर लटकावले
ठाणे सत्र न्यायालयाचा एटीएसला दणका
मशिदीतून नमाज व्यतिरिक्त धर्मप्रसारही केला जातो. मशिदी बांधण्यासाठी निधी देण्याचे आवाहन केले जाते. या सगळ्या गोष्टींचा प्रचंड गोंगाट असतो. या आवाजामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि रुग्णांवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा अलाहबाद न्यायालयाच्या आदेशानुसार या आवाजाचा बंदोबस्त करण्यात यावा आणि अनावश्यक भोंगे हटवण्यात यावेत अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी अलाहबाद विद्यापीठाच्या कुलगुरु संगीता श्रीवास्तव यांनी भोंग्यांविरोधात तक्रार केली होती. श्रीवास्तव यांच्या तक्रारी नंतर भोंग्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. प्रयागराजचे पोलीस महानिरीक्षक यांनी मशिदींवरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यांनी प्रयागराज मधील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून यासंबंधीच्या सूचना केल्या.