मुंबई आणि महाराष्ट्रात ५० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावर लॉकडाउन उठविता येईल, असे वक्तव्य मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अनलॉकसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल, अशीच शक्यता आहे. कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील असंही अस्लम शेख म्हणाले आहेत.
अस्लम शेख म्हणाले की, “जोपर्यंत मुंबई शहर आणि महाराष्ट्रात ५० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणताही दिलासा देणं हे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊनमध्ये कसा दिलासा देता येईल, काय नियम असतील, कोणत्या दुकानांना परवानगी देता येईल याचा विचार सुरु आहे. टास्क फोर्स याबाबत सूचना करतील. त्यानंतर कॅबिनेटमध्ये योग्य तो निर्णय घेऊन, यासंदर्भात घोषणा केली जाईल.” महाराष्ट्रात लसीकरणाबाबत गोंधळाचे वातावरण आहे. आता ४५ वयावरील व्यक्तींनाच लसी दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत हे ५० टक्के लसीकरण कधी होणार आणि अनलॉकची प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
देशात कोरोना संसर्ग फोफावत असताना मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनलॉक होईल का अशी लोकांना अपेक्षा आहे. पण अर्ध्या जनतेचे लसीकरण झाल्याशिवाय अनलॉक होणे कठीण असल्यामुळे ते केव्हा होईल, हादेखील प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
हे ही वाचा:
गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे
‘सुपर स्प्रेडर’ शेतकरी आंदोलनाला आज दिल्लीत सुरवात
व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट; १ जूनपासून शटर उघडणारच
डॉ. जयंत नारळीकर उलगडणार ‘सावरकरांची विज्ञाननिष्ठा’
मुंबईतील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, पण संपलेला नाही. लोकल ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील १५ दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशातच राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येचा आलेख आता उतरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु, १ जूननंतर लॉकडाऊन वाढणार की निर्बंध हटवणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे.