राजकारणात विरोधी असावं पण शत्रू असू नये. हे वाक्य आपण सर्वांनीच ऐकलं असेल. याचं एक अत्यंत वेगळं आणि विलक्षण उदाहरण काल पहायला मिळालं. भाजपाचे बिहारमधील खासदार राजीव प्रताप रुडी आणि द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांची काल दिल्ली चेन्नई विमानप्रवासात भेट झाली. पण ही भेट विलक्षण होती याच कारण म्हणजे या विमानात दयानिधी मारन हे प्रवासी म्हणून बसले होते तर रुडी हे त्या विमानाचे वैमानिक होते. विशेष बाब म्हणजे विमानात बसण्यापूर्वी केवळ २ तास आधी हे दोन्ही खासदार संसदेतील एका समितीत एका अत्यंत रंगलेल्या चर्चेत सहभागी होते.
राजीव प्रताप रुडी हे प्रशिक्षित वैमानिक असून ते इंडिगो एअरलाईन्सचे वैमानिक आहेत. मारन जेंव्हा विमानात येऊन बसले तेंव्हा वैमानिकाने त्यांना येऊन विचारले, “तुम्हीही आहेत तर या विमानप्रवासात?” चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे मारन हे रुडींना ओळखू शकले नाहीत. मारन यांच्या चेहऱ्यावरील अवघडलेल्या आणि बुचकळ्यात पडलेल्या मुद्रा बघून रुडींना हसू आवरले नाही, आणि त्यांनी हसल्याबरोबर मारन यांनी रुडींना ओळखले. अवघ्या दोन तासापूर्वी राजकारण्याच्या पोशाखात असलेले रुडी हे अचानक वैमानिकाच्या पोशाखात बघून मारन यांना धक्काच बसला. त्यावर रुडी यांनी त्यांना सांगितलं की मी अनेकवेळा वैमानिक म्हणून काम करतो.
मारन यांनी हा घडलेला प्रसंग नंतर एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. कितीवेळा एक खासदार दुसऱ्या खासदाराला विमान चालवत घेऊन जाण्याचा प्रसंग येतो? असं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं. घडलेल्या प्रसंगचं वर्णन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, “माझे मित्र रुडीजींना बघून मला आनंद झाला. रुडीजी राज्यमंत्री असताना माझे वडील कॅबिनेट मंत्री होते, तेंव्हापासून आमची चांगली ओळख आहे. रुडीजींनी मला सुखरूप चेन्नईला पोचवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. असा अनुभव मला मिळाला हे मी माझं भाग्यच समजतो.”
हे ही वाचा:
कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत
‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख
वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले
द्रमुक आणि भाजपा हे राजकीय पटलावर एकमेकांचे विरोधक आहेत. परंतु विरोधक हा आपला शत्रू नसतो हे या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं. राजकारणात राजकीय मतभेद आणि वैयक्तिक मैत्री ही कशा पद्धतीने जपता येऊ शकते हेही आपल्याला या उदाहरणातून दिसून येतं.