नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु

नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु

नवी मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्षाची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तशी चर्चासुद्धा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी महापालिका निडवणुकीत शिवसेनेला 70 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी शिवसेनेकडे जास्त जागा मागितल्या आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र नवी मुंबई आणि परिसरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकीय अस्तित्व कमी आहे. याच कारणामुळे शिवसेना या दोन्ही पक्षांचे मत विचारात घेत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे अस्तित्व तुलनेने कमी असल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी ‘एकला चलो’ चा सूर आळवला आहे. त्यामुळे इथल्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षाने जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच या निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्यासाठी मनसेनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी राजठाकरे यांच्या पत्नी आणि चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील तीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर २५ जानेवारी रोजी एपीएमसी फळ मार्केटमध्ये शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते वाहतूक सेनेचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मिळून सरकार स्थापन केले असले तरी, येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपामध्ये पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जास्त जागांची मागणी केली आहे. तर शिवसेना त्यांना समाधानकारक जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे आगामी काळात येथे कोणते राजकीय बदल होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version