लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे याच जागेवरुन महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या जागेवर आता आता उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्जल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपाने तिकीट देऊ केली आहे. भाजपाने १५ वी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये केवळ निकम यांचाच उल्लेख आहे.
कोण आहेत उज्ज्वल निकम?
उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. ते मूळचे जळगावचे असून त्यांचे वडील हे ही न्यायाधीश होते. निकम यांनी जळगावमधून कायद्याची पदवी घेतली आहे. तिथल्या जिल्हा न्यायालयातून त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राज्य स्तरावरील केसेस लढण्यास सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रीय स्तरावरील केसेसही हाताळण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये निकम यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
हे ही वाचा:
“विरोधकांकडे सर्वच इंजिन; डब्बे लावायला कोणी तयार नाही”
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यापूर्वी आरोपींकडून बिहारमध्ये सराव
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
भारत आत्मनिर्भर; चीनमधून खेळण्यांची आयात ७० टक्क्यांनी घटली
माहितीनुसार, निकम यांनी आतापर्यंत ६२८ हून अधिक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचं काम केलं आहे. हायप्रोफाईल केसेस हाताळत असल्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे. १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली आहे. तसेच गुलशन कुमार मर्डर केस, प्रमोद महाजन मर्डर केस, २०१३ तील मुंबई गँग रेप आदी महत्त्वाच्या केसेस ते लढले आहेत.