उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले” असं प्रभाकर देशमुख म्हणाले.
हे ही वाचा:
चार दिवसानंतर देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ
५० टक्के लसीकरण झाल्यावरच मुंबईत अनलॉक
गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अनुसरण्याची वेळ आली आहे
‘सुपर स्प्रेडर’ शेतकरी आंदोलनाला आज दिल्लीत सुरवात
“त्या निर्णयाचा अध्यादेश लेखी घ्यावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी परिसरातील भीमनगर येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. सोमवारी जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य सरकार त्वरीत तोंडी आश्वासने देतात, मात्र लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थळी अध्यादेश घ्यावा” अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.