खड्डे कायम ठेऊन पालिका करणार रस्त्यांचे सुशोभीकरण

खड्डे कायम ठेऊन पालिका करणार रस्त्यांचे सुशोभीकरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बृहन्मुंबई महानगर पालिकेला जून अखेरपर्यंत फूटपाथ आणि उड्डाणपूलांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना नालेसफाई आणि त्यांचे रुंदीकरण करण्याचे आदेश दिले. मान्सूनमध्ये दरवर्षी मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. ते रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिले आहेत.

 

ठाकरेंनी मनपा अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मनपा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बैठकीत एक सादरीकरण मांडले. त्यात त्यांनी असे सांगितले की २४ वॉर्ड्सपैकी १४९ पादचारी मार्गांची निवड ही सौंदर्यीकरणासाठी करण्यात आली आहे. मे अखेरपर्यंत ९०% पादचारी मार्गांचे काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

मनपा ४२ उड्डाणपुलांचे सुशोभीकरण करणार असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित मनपा अधिकाऱ्यांनी दिली. स्ट्रीट फूड साठीदेखील ६२ रस्ते सुशोभीकरणासाठी निवडले आहेत हेही त्यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगर पालिकेत १९९२ पासून शिवसेनेची सत्ता आहे. वर्षानुवर्ष सत्तेत असूनदेखील ठाकरे कुटुंबातील मुख्यमंत्र्यानी अशा प्रकारचे आदेश देण्याची वाट शिवसेना बघत होती का? महानगर पालिकेतील रस्ते आणि पादचारी मार्गांचे सौंदर्यीकरण तर दूरच पण बांधकामदेखील पूर्ण झालेली नाही. शिवाय अनेक रस्ते आणि पादचारी मार्ग हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.

Exit mobile version