माझ्या वडिलांचे नाव वापरू नका, असा इशारा देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जाब विचारला आहे. जर नाव वापरू नका असे म्हणणे असेल तर मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यात सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाने कशासाठी? ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा, अशा शब्दांत आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.
उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी दोन भागांत मुलाखत घेतली असून त्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनी आपल्या वडिलांचे नाव वापरू नये, ते माझ्या वडिलांचे नाव आहे, तुमच्या वडिलांचे नाव वापरा असे म्हटले होते. त्यावरून आमदार भातखळकर यांनी उद्धव यांना लक्ष्य केले आहे.
माझ्या वडिलांचे नाव वापरू नका – उध्दव ठाकरे
पण त्यांचे स्मारक महापौर बंगल्यात, सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाने करा…
ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उध्दव जी…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 27, 2022
मुंबईच्या महापौर बंगल्यात सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी होत असलेला खर्च हा सरकारी खजिन्यातून होत आहे. त्यावरूनच आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. ५०० कोटींचा जो खर्च या स्मारकासाठी सरकारी खजिन्यातून होणार आहे तो उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या खिशातून करावा असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांनी केली रतन टाटांची विचारपूस
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपीला जेलमध्ये मारहाण
हे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील विविध ठिकाणांचा शोध घेतला जात होता. त्यानंतर महापौर बंगल्याची जागा निवडण्यात आली. त्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. सरकारी बंगल्याचा उपयोग या पद्धतीने केला जात असल्याबद्दल लक्ष्य करण्यात आले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महापौर बंगला बाळासाहेबांच्या स्मारकासाठी निवडल्याबद्दल टीका केली होती. मुंबईत अन्य कुठली जागा मिळाली नाही का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता.