महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पाऊल टाकले आणि पहिली सभा झाली ती खेडमध्ये. तिथे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच भाषण केले. पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर त्यांनी टीका केली पण प्रामुख्याने त्यांचा राग दिसून आला तो निवडणूक आयोगावर.
निवडणूक आयोगाचा फैसला मला मान्य नाही. मी ते सहन करणार नाही. ते ठरवू शकत नाहीत शिवसेना कुणाची अशी भाषा वापरून त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्वीकारण्यापासून इन्कार केला. मात्र दुसरीकडे त्यांच्या या भाषणस्थळी कुठेही धनुष्यबाण हे चिन्ह किंवा शिवसेना हे नाव मात्र दिसले नाही. तिथे मशाल हे चिन्हच पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, चिन्ह चोरले असले किंवा नाव चोरले असले तरी तुम्ही पक्ष घेऊ शकत नाही. तो माझा आहे. मी तुम्हाला हवा आहे की पक्षप्रमुख म्हणून शिंदे हवे आहेत हे तुम्ही ठरवा.
हे ही वाचा:
भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले
होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा
‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’
ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
दुसरीकडे ते म्हणाले की, तुमच्याकडे पक्षाचे नाव असेल, चिन्ह असेल त्यासह तुम्ही या लढायला. मी मशाल घेऊन येतो तुमच्याशी दोन हात करायला. त्यांच्या या वाक्यांतून त्यांनी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला आता गेले आहे हे मान्यच केल्याचे दिसत होते. पण तशी थेट कबुली ते देत नव्हते. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती आता पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश आणि विरोधी पक्ष नेता अशी समिती करणार या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागतही त्यांनी केले पण याच निवडणूक आयोगाकडून चिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते, याचा मात्र विसर पडला.
निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याला मान्य नाही, फैसला आपण मान्य करत नाही, हे म्हणताना मग आपण काय करणार हे मात्र उद्धव ठाकरेंनी सांगितले नाही. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही पण आपण ते चिन्ह वापरायचे नाही, नाव वापरायचे नाही हे त्यांनी स्वीकारल्याचेही दिसत होते. बाकी भारतीय जनता पक्ष स्वातंत्र्यचळवळीत कधीही नव्हता, शिंदेंचे सगळे आमदार हे गद्दार आहेत, अफझल खानाने कसे सगळ्यांना आपल्यात सामील होण्याची धमकी दिली होती ती दिल्यावर खंडोजी खोपडा त्यात सामील झाला होता याची आठवण करून देत त्याची तुलना एकनाथ शिंदेंशी करण्याचा आटापीटा केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पुन्हा एकदा तोच इतिहास, तोच शिवाजी महाराजांचा कालखंड, क्रांतिकारकांचे बलिदान याचा पुन्हा पुन्हा उल्लेख आला.