उद्धव ठाकरे यांना आता आठवले ‘देश प्रथम’

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीची घोषणा

उद्धव ठाकरे यांना आता आठवले ‘देश प्रथम’

शिवशक्ती आणि भीमशक्ती नव्या युतीची घोषणा करतांना उद्धव ठाकरे यांनी देश प्रथम असा नवीन राग आपल्या भाषणात आळवला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र प्रथम किंवा राष्ट्रहित सर्वोपरी या भूमिकेच्याच पावलावर पाऊल टाकणारी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, याची चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे.

देश प्रथम कारण देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल हे नेहमीचे टुमणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी लावले. उद्धव ठाकरे यांनी देश प्रथम हा पवित्रा एकदम का घेतला याविषयीही चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. बुडत्या पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा पुन्हा एक नवीन प्रयोग करून बघत आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आणि भाजपविरोधात, हुकुमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही. लवकरच दोन्ही पक्षांची चर्चा करुन याबाबत भूमिका स्पष्ट करू.

वंचित बहुजन आघाडीशी युती केली असली तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ते मान्य असेल का, याविषयी मात्र संभ्रम अद्याप कायम असल्याचे पत्रकार परिषदेतही दिसून आले.

वंचितसोबत व इतर मित्र पक्षांसोबत जागावाटप कसे होईल, याबाबत विचार करुनच वंचितसोबत युती केली आहे असेही ते म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वंचितला विरोध करतील असे वाटत नाही असे मत व्यक्त करताना महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांबद्दल ठाकरे यांना अजूनही ठाम विश्वास व्यक्त करता आला नाही.

हे ही वाचा:

मौलाना रशिदीने गरळ ओकली; म्हणे सोमनाथ मंदिरात गैरव्यवहार होत होते म्हणून ते तोडले

अख्ख्या पाकिस्तानची बत्ती गुल!

युती टिकवायचे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही

सरसंघचालक म्हणाले,नेताजींची स्वप्ने अजून अपूर्ण

वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या प्रतिकारासाठी नेताजी नेहमीच स्मरणात राहतील

आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Exit mobile version