काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे. नाना पटोले यांनी सतत स्वबळाचा नारा दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाल्याचं दिसून येतंय. ही नाराजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे व्यक्त केल्याची माहिती आहे.
राज्यात भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. या सरकारमधील मंत्र्यांवर आरोप झाले, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, मंत्री अनिल परब ह्यांच्यावर देखील आरोप सुरु आहेत. सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप ही तिन्ही पक्षाकडून केला जातो. असं असताना तिन्ही पक्षानी एकत्र असण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने शिवसेनेत विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे मंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी भावना शिवसेनेत निर्माण झाल्याची चर्चा आहे. सामना अग्रलेखातून आधी स्वबळाचा नाऱ्याबाबत वक्तव्य करण्यात आलं. काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी २०२४ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करूनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा थांबवली नाही.
उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख म्हणून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उघड भूमिका मांडली तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत काँग्रेस मंत्र्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. महाविकास आघडी सरकार सत्तेत असताना अशा प्रकारचं सातत्यानं येणारं वक्तव्य तिन्ही पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहे अशी सेनेची भूमिका आहे.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून हिंगोली जिल्ह्याला ७० कोटी
ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ
१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर ठाकरे सरकारला तेरवीची भिती
उत्तरप्रदेशात जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यावर रासुका
एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची स्वबळाची भाषा यामुळे सेनेची कोंडी होत असल्याची भावना पक्षात आहे. त्यामुळे काँग्रेसने या गोष्टी वेळीच हाताळाव्या असा संदेश ही काँग्रेसला शिवसेनेनं दिल्याची माहिती आहे.