“उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात पाल्हाळिक बोलण्यापलीकडे काय केले?” असा टोला भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला. “मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात काय केले हे सांगावे. तुम्ही पाल्हाळिक बोलणे बंद करा. तुम्हाला कोरोना रोखता आला नाही, याची कबुली द्यावी. लॉकडाऊन हा काही पर्याय नाही.” अशी टीका पडळकर यांनी केली.
शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकरांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. “मुख्यमंत्र्यांनी लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवून घाबरवणे बंद करावे. मुख्यमंत्री काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करण्यासाठी आहेत का? मुख्यमंत्र्यांनी खुर्च्या सोडून रस्त्यावर उतरले पाहिजे.” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाहीत. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
रुग्णांना मरायला सोडलंय का?- गिरीश महाजन
संजय राऊत यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाली होती पवार-राऊत भेट
नव्या कोरोनाची प्राणघातकता कमी
राहुल गांधी पाकिस्तानी ‘प्रॉपगॅन्डा’ चालवत आहेत का?
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला. कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, अशी टीका फडणवीस यांनी केली.