महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नाही. पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी खरमरीत टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते पश्चिम बंगालची निवडणूक अशा विषयांवर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. सरकारमधील मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करायला सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा आदेश देण्यात आला होता का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ
जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब
सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही- संजय राऊत
चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावरही भाष्य केले. सध्याच्या घडीला आठ यंत्रणा माझा फोन टॅप करत आहेत. मी सरळ सरळ हा आरोप करत आहे. मात्र, मी कुणाकडे पैसे मागत नाही. त्यामुळे मला कसलीही भीती वाटत नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.