संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार

संजीवनी, शंकासुर आणि महाराष्ट्राचा ‘दशा’वतार

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक भारतातील सर्व राज्यांमध्ये अगदी तळाला आहे. याची जबाबदारी उद्धवजी स्वीकारणार आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. लसी उपलब्ध असूनही त्या का दिल्या जात नाहीत याचे उत्तर त्यांनी राज्याच्या जनतेला द्यायला हवे. ते न करता उद्धवजी लसीबद्दल संभ्रम मात्र निर्माण करीत आहेत. भारतात बनलेल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींचा आजवर शंभरावर देशात पुरवठा करण्यात आला आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनरो यांनी तर भारतातून आलेल्या लसींना संजीवनीची उपमा देऊन धन्यवाद व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये चीनची लस उपलब्ध असताना तिथले नागरीक भारताची लस मागतायत. बांगलादेशने चीनच्या तुलनेत भारताच्या लसीला प्राधान्य दिले. नेपाळमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. लसीच्या माध्यमातून अवघ्या जगात भारताची मान अभिमानाने ताठ झाल्यामुळे स्वाभाविकपणे चीनची प्रचंड जळजळ होते आहे. लसीच्या माध्यमातून भारताचा वाढलेला जागतिक प्रभाव चीनला खूपतो आहे. चीन हा आपला उघड शत्रू आहे, प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे भारताच्या यशामुळे चीनला होणारी पोटदुखी समजू शकते. परंतु भारतातील काही विरोधी पक्षांनाही भारताचे यश सहन होऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे.

समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपाच्या कोविड लसीवर आपला विश्वास नसल्याचे विधान करून सवंग राजकारणाची झलक दाखवली.

‘जगात २३ लाख लोकांनी कोविडची लस घेतली, भारतीयांना लस कधी मिळणार’? असा सवाल करणा-या राहुल गांधी यांनी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा अभिनंदनाचा एक शब्दही काढला नाही. लसीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार झाला. ‘आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी जेणे करून लस सुरक्षित आहे, असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होईल’, अशी विधाने करून लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मोदींची विश्वासार्हता या सगळ्या शंकासुरांना पुरून उरली. जनता आश्वस्त होती. मोदींबाबत जनतेच्या मनात कोणतीही शंका नव्हती. लशीची निर्मिती करण्या-या शास्त्रज्ञांबाबत पराकोटीचा विश्वास होता.

लसीबद्दल संशयाचे धुके निर्माण करणा-या राजकीय ब्रिगेडमध्ये काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भर पडली. भारताच्या लसी आफ्रिकेने परत पाठवल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी कालच्या फेसबुक लाईव्हमध्ये केले. ही गोष्ट सफेद झूठ होती.

चीन भारतीय लसीबाबत संशय निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. कारण भारताच्या लसीमुळे चीनी लसींना विचारणारा कोणी उरलेला नाही. जगातील अनेक फार्मा कंपन्यांच्या नफ्याचे गणितही भारतीय लसीच्या यशामुळे उलटे पालटे झाले. त्यामुळे भारतीय लसीच्या विरोधात प्रोपोगंडा सुरू होण्याची दाट शक्यता होती. आफ्रिकेने भारताची लस परत पाठवली अशी अफवा पसरवून या प्रोपोगंडाला सुरूवातही झाली होती. परंतु ही अफवा पसरण्याच्या आधीच दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. झ्वेली मखीझे यांनी ‘भारतात तयार झालेली लस आम्ही परत पाठवलेली नाही, या लसीची मुदत उलटून गेली या वृत्तातही तथ्य नाही’, असा खुलासा केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही बाब माहीती नसेल असे कसे म्हणावे? मुख्यमंत्र्याला आजूबाजूच्या घडामोडींचा तपशील पुरवण्यासाठी एक मजबूत यंत्रणा अहोरात्र राबत असते. त्यामुळे त्यांच्याकडे तथ्य नसतील असे म्हणणे नादानपणाचे आहे. परंतु तरीही ‘आफ्रीकेने आपल्या लसी परत पाठवल्या असल्या तरी त्या लसी काय अगदीच ‘ह्या’ नाहीत’, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे. अगदीच ‘ह्या’

नाहीत या वाक्याचा महाराष्ट्राच्या जनतेने काय अर्थ काढावा?

मोदींना पराभूत करता येत नाही ही सल विरोधी पक्षांच्या मनात खोलवर रुजत चालली आहे, त्यामुळे त्यांना कमकुवत करण्यासाठी काहीही करण्याची विरोधकांची तयारी असते. चीनने गलवान क्षेत्रात घुसखोरी केली तेव्हा चीनला सवाल विचारायचे सोडून काँग्रेस नेते राहुल गांधी सतत भारत सरकार आणि भारतीय लष्करावर तीर चालवत होते. राजकारणाने नीचतम पातळी गाठली आहे. लसीच्या नथीतून तीर मारताना उद्धव ठाकरे यांनी नेमके तेच केले.

आफ्रिकेने भारताच्या लसी परत पाठवल्या ही लोणकढी थाप होती. “भारताच्या लसी काय अगदीच ‘ह्या’ नाहीत,” हा लसीबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कोरोना जेव्हा आला तेव्हा या  आजारावर काही उपाय आहे की नाही, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. त्यामुळे रोगापासून पळ काढणे हाच बचाव होता. परंतु आज या आजारावर लस उपलब्ध आहे. भारतानेच या लसीची निर्मिती केली आहे. त्यामुळे पहील्या टप्प्यात राबवलेल्या लॉकडाऊन सारख्या उपायांची आता गरजच उरलेली नाही.

लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून लोकांना सुरक्षा कवच देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेला आक्रोश कोरोनाच्या नावाखाली कसा दाबता येईल, याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिसला. कोरोना लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक भारतातील सर्व राज्यांमध्ये अगदी तळाला आहे. याची जबाबदारी उद्धवजी स्वीकारणार आहेत की नाही हा कळीचा मुद्दा आहे. लसी उपलब्ध असूनही त्या का दिल्या जात नाहीत याचे उत्तर त्यांनी राज्याच्या जनतेला द्यायला हवे. ते न करता उद्धवजी लसीबद्दल संभ्रम मात्र निर्माण करीत आहेत. हे राजकारण महाराष्ट्रातील जनतेच्या हीताचे नाही. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र असताना जनतेला राजकीय कुरघोड्या पाहण्याची इच्छा नाही त्यांना आपल्या आणि कुटुंबियांच्या आरोग्य सुरक्षेची खात्री देणारी लस हवी आहे. अपेक्षा माफक आहे. मुख्यमंत्री महोदय ती पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा वेगळ्या अर्थाने प्रत्यक्षात न येता अभिप्रेत असलेल्या अर्थाने प्रत्यक्षात यावी.

Exit mobile version