फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांच्या यादीवरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला. एकूणच आतापर्यंतच्या फेसबुक लाइव्हमध्ये झालेला केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रमच यावेळीही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसले. आपल्याकडे तूर्तास कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असाच या भाषणाचा सूर होता.

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हमधून पदरी निराशाच

महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस असे काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल, अशी अपेक्षा असताना फुटकळ आश्वासनांपलिकडे फारसे काही पदरी पडले नाही. एकीकडे महाराष्ट्रातील सुविधा अपुऱ्या आहेत, अशी नेहमीची तक्रार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांच्या यादीवरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला. एकूणच आतापर्यंतच्या फेसबुक लाइव्हमध्ये झालेला केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रमच यावेळीही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसले. आपल्याकडे तूर्तास कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असाच या भाषणाचा सूर होता. संपूर्ण लॉकडाउनची घोषणा होईल, अशी शक्यता होती, पण तशी स्पष्ट घोषणा न करता मागल्या दाराने लॉकडाउन करण्याची पळवाट शोधण्यात आली. तरीही लोकांमधील संभ्रम अद्याप कायमच आहे. नेमका लॉकडाउन लागला आहे की नाही हेच या भाषणातून स्पष्ट झालेले नाही.

मुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवसांसाठी संचारबंदी जाहीर केली आहे. १४४ हे कलम लागू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या काळात सार्वजनिक वाहतुकीचा वापर फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच करायचा असल्यामुळे बाकी क्षेत्रातील लोकांची परवड होणार आहे. त्या लोकांसाठी नेमके कोणते नियम असतील, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ जावा लागेल. हॉटेल, रेस्तराँसाठी पार्सल सेवा किंवा होमडिलिव्हरीची परवानगी देताना रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांनाही परवानगी दिली आहे. पण ते पदार्थ घेण्यासाठी लोक संचारबंदीच्या काळात कसे जाणार हा मुद्दा चर्चिला जाणार आहे. शिवथाळी मोफत दिली जाणार आहे असे म्हटले तरी याच संचारबंदीच्या काळात लोकांनी या थाळीचा आस्वाद घ्यायचा की पोलिसांच्या काठीचा प्रसाद खायचा याचे उत्तर मात्र या संभाषणातून मिळालेले नाही.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ विलगीकरणात

मोरीच्छपी हत्याकांड: बंगालच्या राजकारणातील जातीयता

हा तर ठाकरे सरकारच्या अपयशाचा उद्रेक

आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी

ज्या आश्वासनांचा उल्लेख केला तोही कामगार, रिक्षाचालक, बांधकाम कर्मचारी, घरगुती कामगार यांच्यासाठी फुटकळच आहे. एकावेळी १००० रुपये किंवा १५०० रुपये अशी मदत लोकांना केली जाणार आहे ती नेमकी कशी आणि कधी मिळणार हे कळण्यासाठी आता या स्तरातील लोकांची धावपळ होणार आहे. लाभार्थी लाखो आहेत मग त्यांना हा लाभ मिळणार कसा हे आता स्पष्ट करत बसावे लागणार आहे. शिवाय, ही मदत पुरेशीही नाही. एकूणच आपल्या हाती फार काही नाही. केंद्राची मदत मिळाली किंवा उद्योगपतींनी आपापल्या परीने हातभार लावला तरच आपण तग धरणार आहोत, असाच सूर मुख्यमंत्र्यांनी आळवला आहे. याच उद्योगपतींनी लॉकडाउन करू नका अशी सूचना केल्यावर त्यांच्यावर ठाकरे सरकारने टीका केली होती. त्यांच्याकडूनच आता मदत मागावी लागणार आहे. १०वी, १२वीची परीक्षा पुढे ढकलली असली तरी करोनाविरोधातील परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, त्यात आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे, असा आव आणला असला तरी ते उत्तीर्ण कसे व्हायचे याचे ठोस उत्तर मिळत नाही. जे काही आहे ते आता केंद्रावरच अवलंबून आहे हेच या भाषणातून दिसून आले आहे.

Exit mobile version