वांद्रे पूर्व परिसरातील ठाकरे गटाची एक शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत त्या शाखेवर जेसीबी चालवून मुंबई पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारत मारहाण केली होती. त्यानंतर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यांची जामीनावर सुटका होताच उद्धव ठाकरेंनी त्यांचा सत्कार केल्याची माहिती समोर आली आहे.
पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौघांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मातोश्रीवर बोलवून सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी या चौघांचा सत्कार करत त्यांना शाबासकी दिली. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असूनही उद्धव ठाकरेंकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“शिवसेना काय आहे हे तुम्ही दाखवून दिले. कौतुक करायला शब्द नाहीत. ही लढाई विकृत आहे. महाराष्ट्राबद्दल मनात द्वेष भरला आहे त्यामुळे भाजपाला शिवसेना नको. त्यासाठी त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. महाराष्ट्रात विरोध करायला त्यांना कोणी नको आहे. पण, हे होऊ देणार नाही हे तुम्ही दाखवून दिलं त्यासाठी कौतुक,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
प्रकरण काय?
वांद्रे पूर्व परिसरातील ठाकरे गटाची एक शाखा अनधिकृत असल्याचे कारण देत शाखेवर जेसीबी चालवून कारवाई करण्यात आली होती. शाखेवर कारवाई करताना शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्याने ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली.
हे ही वाचा:
भारतासह पाच देशांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक; विकसित देशांच्या गुंतवणुकीत मात्र घट
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
आमदार अनिल परब यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांना अटक करण्यात आली होती.