विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर घाणाघात

विरोधकांच्या बैठकीत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी

देशात मंगळवार, १८ जुलै रोजी दोन महत्त्वाच्या बैठका आयोजित असून दिल्लीत एनडीएची बैठक होते आहे तर बंगळुरुमध्ये विरोधकांची बैठक होत आहे. बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला आहे. तसेच त्यांनी त्याची भूमिका स्पष्ट करावी, असंही म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम” घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. “उद्धव ठाकरे, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे. भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला ‘धर्मांतर विरोधी कायदा’ नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला. तुम्ही मूग गिळून गप्प बसले. कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. तुम्ही गप्प बसले,” अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

“ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे. तुम्ही सहभागी झाले!  उद्धव ठाकरे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही? की, मूग गिळून बसणार? न्यायालयाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही? की, फक्त महाराष्ट्रात ‘टोमणे’ मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात? की, पुन्हा मूग गिळून बसणार?” असे सणसणीत प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

हे ही वाचा:

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

जगातील सर्वांत वाईट शहरांमध्ये पुन्हा कराची

कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. भाजपाला पर्याय म्हणून याकडे पाहण्यात येत आहे. पाटणा येथील बैठकीनंतर सोमवार (१७ जुलै) आणि मंगळवार (१८ जुलै) या दोन दिवशी कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची बैठक आहे. या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

Exit mobile version