राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारणारे उद्धव ठाकरे म्हणतात, ‘इंडी’चे सरकार आल्यास मंदिराचं काम पूर्ण करणार

भाजपाने केलेल्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांनीही मांडली भूमिका

राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारणारे उद्धव ठाकरे म्हणतात, ‘इंडी’चे सरकार आल्यास मंदिराचं काम पूर्ण करणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी थंडावणार आहेत. राज्यात सोमवार, २० मे रोजी मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण- डोंबिवली, भिवंडी, पालघर, नाशिक, आदी जागांवर मतदान होणार आहे. अशातच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

“आमचं सरकार आल्यानंतर राम मंदिराचं काम पूर्ण करणार. त्यांनी जे अर्धे काम केलं ते आम्ही पूर्ण करू,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, देशातील ‘जुमला पर्व’ ४ जूनला संपणार आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ येणार असं म्हणाले होते. ते अच्छे दिन ४ जूनपासून येणार आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई आणि महाराष्ट्राची सुरू असलेली लूट इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल. आम्हाला नकली शिवसेना म्हणणारे आरएससला देखील नकली संघ म्हणतील,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शरद पवार म्हणाले की, “जितक्या धार्मिक संस्था आहेत मग त्या हिंदू, मुस्लीम, खिश्चन किंवा शीख धर्मीयांच्या असो त्यांचा आदर करणं आमचं काम असेल.”

“राम मंदिर हे ट्रस्टच्या वतीनं बांधले जात आहे. जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात. निवडणूक आयोगाने प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही करु शकत नाही, ज्या अशक्य आहेत, त्या सांगून लोकांना भडकावलं जात आहे. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक गोष्टींचं संरक्षण होईल, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही संविधानानुसार चालणार,” असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

हे ही वाचा:

“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला

केजरीवाल यांनी न्यायालयात आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे

कन्हैया कुमार यांना हार घालण्याच्या बहाण्याने मारहाण

यापूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास इंडी आघाडीच्या सर्व घटका पक्षांनी नकार दिला होता. यात उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसच्या विचारधारेवर चालत असल्याची टीका केली होती. इंडी आघाडीच्या या भूमिकेचा सर्वच पक्षांना विशेषतः काँग्रेसला याचा जबरदस्त फटका बसला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि इंडी आघाडीने घेतलेली राम मंदिराच्या बाबतीतली भूमिका काही बड्या नेत्यांना पटली नव्हती त्यामुळे त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

Exit mobile version