दादर पूर्व रेल्वे स्थानक येथे असलेले ८० वर्ष जुने हनुमानाचे मंदिर हटवण्याची नोटीस रेल्वे मंत्रालयाने दिल्याची माहिती समोर आली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. ठाकरे गटाकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, महेश सावंत हे या हनुमानाच्या मंदिरात जाऊन महाआरती करणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला मिळालेल्या नोटीसीला रेल्वेकडून स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा केली. तसेच हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण करू पाहणाऱ्या ठाकरे गटाला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी चांगलेच सुनावले आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची अवस्था अशी झालीय की, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बनवाबनवीला, व्होट जिहादला धर्म युद्धाने रोखलं आणि ते पराभूत झाले. त्यामुळे ते निराश होऊन पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा धरत स्टंटबाजी करत आहेत. ज्यांनी हनुमान चालिसा बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं, ते हिंदुत्वाची भाषा करतायत. त्यांनाचं हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे,” अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.
हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. तर हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, विश्व हिंदू परिषद आणि आमचे सर्व बजरंग दलाचे पदाधिकारी हे केंद्राशी संपर्कात होते. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नोटीसीवर आता स्टे ऑर्डर काढण्यात आली आहे. मंदिराच्या विषयांमध्ये राजकारणाविषयी मी काही बोलू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
हे ही वाचा :
‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?
‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा
‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह
सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार
काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेने दादर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या हनुमान मंदिराला अनाधिकृत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी यासंदर्भात मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस बजावली होती. हे मंदिर रेल्वेच्या जमिनीवर असून परवानगी न घेता बांधण्यात आलं, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला होता. या मंदिरामुळे प्रवाशांना त्रास होत असून पायाभूत सुविधांच्या कामातही अडथळा निर्माण होत असल्याचंही रेल्वेनं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.