शिवसेनेत झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या ४० आमदारांच्या बंडाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे की, शिवसेनेत झालेल्या या बंडाची माहिती शरद पवारांना होती. त्याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही सांगितले होते पण गफलत झाली.
हे ही वाचा:
मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी
दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प
अजित पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे आमदार फुटणार आहेत, याची माहिती दोन-तीन वेळा दिली होती. स्वतः शरद पवार यांनी ही माहिती फोन करून उद्धव ठाकरे यांना दिली पण आपल्या आमदारांवर आपला विश्वास आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी तो विषय अधिक वाढवला नाही. मात्र स्वतः पक्षनेतृत्वाने आमदारांवर हा आंधळा विश्वास दाखविला त्यामुळेच ही गफलत झाली.
अजित पवार यांनी असेही सांगितले की, या सगळ्या गोष्टी घडू दिलेल्या आहेत. आमदारांना तिथे जाऊ दिलं. मी स्वतःदेखील उद्धव ठाकरे यांना हे सांगितलं होतं पण आपण एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू असे ते म्हणाले होते. तो आमच्या पक्षांतर्गत मामला आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर त्याचे राज्यात जोरदार पडसाद उमटले आणि शेवटी शिंदे आणि या आमदारांनी मिळून नवे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात जी निवडणूक जिंकली त्याबद्दल अजित पवार म्हणाले की, सत्यजीत तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यायला हवी होती तसे झाले असते तर आज ही वेळ आली नसती.