शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाला तीन दिवस झाल्यानंतर प्रथमच विधिमंडळात पाऊल ठेवले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच विधिमंडळात दाखल झाले.
विधान परिषदेचे सदस्य म्हणून ते अजूनही आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असताना आपण आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा दिलाच नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. तरीही ते पहिल्या दिवसापासून विधान परिषदेत उपस्थित नव्हते.
विधिमंडळाच्या परिसरात आल्यानंतरही ते विधान परिषदेत उपस्थित राहिलेले नाहीत तर महाविकास आघाडीच्या बैठकीला ते हजर होते. आगामी काळात होत असलेल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते.
त्यांनी विधिमंडळ परिसरात प्रवेश केल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
राज्यात राजकीय नाट्य घडल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच इथे आले. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही ते मंत्रालयात कधी फिरकले नाहीत तरी त्यांनी एकदा तिथे भेट दिली. त्याचे कौतुक झाले होते. त्याप्रमाणे आता विधिमंडळात आल्यावर मीडियाने त्यांच्यावर कौतुकाची बरसात केली.
हे ही वाचा:
प्रेमासाठी एकाने केली आत्महत्या तर दुसऱ्याने रचले अपहरणाचे नाट्य
कोकणातील रस्तेदुरुस्ती गुरुवारपर्यंत पूर्ण करा
देवगडला मत्स्य व्यवसाय महाविद्यालय मंजूर करा
गौतम अदानींचा ‘एनडीटीव्ही’त मोठा हिस्सा
विधान परिषदेच्या आमदारकीसाठी उद्धव ठाकरे यांनी तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घातली होती. त्यानंतर या आमदारकीसाठी निवडणूक झाली आणि ते बिनविरोध निवडून आले. पण मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर आपण आमदारकीही सोडत आहोत, असे ते म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा दिलाच नव्हता. विधान परिषदेतील संख्याबळ कमी होईल या शक्यतेमुळे त्यांनी राजीनामा दिलेला नाही. जर राजीनामा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एवढेच त्यांचे संख्याबळ होऊ शकेल, हे लक्षात घेऊनच त्यांनी राजीनामा दिलेला नसावा असे म्हटले जात आहे.