ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर आपली मतं मांडत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा देखील साधला. भाजपाचे हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे वेगळे स्वप्न होते. हिंदुत्वाच्या एका विचारधारेमुळे त्यांनी समान नागरी कायदा आणि ३७० कलम अशा गोष्टींना पाठिंबा दिला. मात्र, आता भाजपाचे हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतोय, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एक विधान, एक निशाण आणि एक प्रधान ही त्यांची घोषणा होती. आता त्यात त्यांनी एकच पक्ष असंही जोडलं आहे. हे देशातील जनता कधीच मान्य करू शकत नाही. एक देश मान्य, एक निशाण मान्य, पण एक प्रधान म्हटला तरी तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण तुम्ही एक पक्षाची टिमकी वाजवत असाल तर कदापी खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपा हिंदुत्वाच्या नावाखाली वाट्टेल ते खपवत आहे. ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ येते. तसेच भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे. एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणून हिणवायचं. त्याला आयुष्यातून उठवायचं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं हे हिंदुत्व नाही, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला. मी हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलंय? हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे काय? पाहिजे तेव्हा सोयीप्रमाणे नेसलं आणि सोडलं असं होत नाही. आमचं असं बेगडी हिंदुत्व नाहीये. आजही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित आहे. मग तुम्ही नऊ वर्षात केलंय काय? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढा दिला. मात्र, शरद पवारांनी वेगळा मार्ग निवडल्याबाबत संजय राऊतांनी विचारणा केली. उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ज्याचा त्याचा मार्ग असतो. मी शिवसेना प्रमुखांच्या मार्गाने चालणारा आहे. त्यामुळे जशास तसं उत्तर देणारा, आरेला कारे करणारा मी आहे. त्यामुळे मी लढतोय. शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे. ते त्यांच्या पद्धतीने जाऊ इच्छित असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
हे ही वाचा:
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली
राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
गांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री
“नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री शरद पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले होते. पण, माझ्याकडे यायची उठाव करणाऱ्या कुणाची हिंमत झाली नाही. बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळं ढोंग होतं. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे म्हणाले होते. आता राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून उठाव करणाऱ्या नेत्यांवर केली.