माझ्या हातात आता काही नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही!

उद्धव ठाकरे यांनी उघड्या गाडीतून भाषण करत व्यक्त केली हतबलता

माझ्या हातात आता काही नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही!

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि त्यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रथमच मातोश्रीबाहेर पडून उद्धव ठाकरे यांनी उघड्या गाडीतून शिवसैनिकांना संबोधित केले.

उद्धव ठाकरे हे कलानगरच्या चौकात आले आणि त्यांनी गाडीतून संवाद साधला. ते म्हणाले की, महाशिवरात्री आणि शिवजयंती या दिवसांचा मुहूर्त बघून शिवसेना नाव चोरले आहे. पण मधमाशांच्या पोळ्यावर त्यांनी दगड मारला आहे. आजपर्यंत त्यांनी मधाचा स्वाद घेतला आहे. आता डंख मारण्याची वेळ आली आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे असेल असा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात धमाका झाला. उद्धव ठाकरे हे आता काय करणार याकडे लक्ष लागलेले असताना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधला.

ते म्हणाले, कोणता पक्ष नसेल ज्याच्यावरती आघात असा ७५ वर्षांच्या लोकशाहीत झाला असेल. भाजपाला, मोदींना वाटत असेल ज्या गुलाम बनलेल्या यंत्रणा आहेत त्यांना अंगावर सोडून अन्य पक्ष संपवता येतील  पण शिवसेना संपवता येणार नाही. निवडणूक आयोगाने जी गुलामी केली त्यांचे आयुक्त कुठेतरी ते राज्यपाल होतील. त्यांना ठाकरे नाव पाहिजे, बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे, कुटुंब नकोय ठाकरेंचे. बाळासाहेबांचे मुखवटे घालून यावे लागत आहेत. जनता मूर्ख नाही मुखवटा कोणता चेहरा कोणता हे ते ओळखतात आव्हान देतो ज्या पद्धतीने धनुष्यबाण दिला गेला. कपट कारस्थान करत आहेत. मशालही काढून घेतली जाईल. धनुष्यबाण चोरले ते मर्द असतील मी मशाल घेऊन तपमच्यासमोर येतो बघूया काय होते ते.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

उद्धव ठाकरे यांची हतबलताही त्या भाषणातून दिसून आली. ते म्हणाले की, लढाई आता सुरू झाली आहे. घाबरला आहात का? माझ्या हातात आता काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण शिवसेनेचा संयम पाहिला आहे. तुम्हाला पुढच्या सूचना मी देत जाईन. ही चोरी पचू द्यायची नाहीए. शिवरायांचा भगवा घेऊन राजकारणात चोरांचा नायनाट केल्याशिवाय राहायचे नाही. शिवसेना संपू शकत नाही.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुद्देच पुन्हा आळवले. ते म्हणाले, धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला पण तो उताणा पडला. तेही उताणे पडतील असा विश्वास मला वाटतोय. खचलेलो नाही, खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. तोपर्यंत असे चोर आणि चोरबाजारचे मालक आले तरी छाताडावर भगवा फडकाविण्याची ताकद आहे आमच्यात. फेसबुक लाइव्ह करीन. निवडणूक आयोगाने काय सांगितले ते काय दिले हे मी सांगेन.

Exit mobile version