कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!

कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असे मोठ्या गर्वाने आपण नेहमीच म्हणत आलो आहे. पण त्या महाराष्ट्राची अवस्था काय ? देशात सर्वाधिक कोरोना बळी गेलेला घेणारा महाराष्ट्र ! संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना शंभर कोटींची खंडणी जमा करणाऱ्या राज्यकर्त्यांचा महाराष्ट्र ! ज्या उद्योजकांनी कोरोना काळात कोट्यवधी रुपये जनतेसाठी खर्च केले त्यांच्या घरावर स्फोटक नेऊन ठेवणारा महाराष्ट्र ! विवश, हतबल, कुबड्यांवर चालणारा आणि निर्णय न घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.

याच महाराष्ट्राने शिवसेनाप्रमुखांसारखा डरकाळी फोडणारा वाघ पाहिला. त्या वाघाच्या पोटी सत्तेसाठी लाचार झालेला नेता जन्माला आल्याचे देशाला बघायला मिळते आहे. महाभारतातील संजय प्रामाणिक होता. तो त्या अंध धृतराष्ट्राला जे घडायचे ते सांगायचा. पण वर्तमानातील संजय बेरक्या आहे. त्याची निष्ठा खरोखरच धृतराष्ट्रावर आहे की हस्तिनापूरला गाडायला निघालेल्या अन्य महाभागांवर आहे,  हे समजणे कठीण आहे. हा संजय खोटारडेपणाचा सामना खेळण्यात व्यस्त आहे. ठाकरे घराण्यातील कोणीच पुढे राजकारणात टिकू नये, अशी सुपारी घेऊन हा संजय वृत्तकथन करतो की काय ! महाभारतात फक्त गांधारीनेच डोळ्यावर पट्टी बांधली होती. इथे तर संपूर्ण शिवसेनेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे. महाराष्ट्राचे वस्त्रहरण करण्याचा सपाटा रोज सुरू आहे. पण संजय महाराष्ट्राचे वृत्तकथन करत नाही. देशातील विविध प्रांतात उदभवलेल्या विविध समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरल्याने आणि आरोपांचे निष्फळ बाण सोडल्याने आपले पाप झाकले जाऊ शकते हा धृतराष्ट्र आणि संजयाचा गोड गैरसमज आहे. मुळात हतबल धृतराष्ट्राला कुठल्याच लढाईचा पूर्वानुभव नाही. त्याने कधी शस्त्र हाती घेतलेलेच नाही. घरात एखादी खाष्ट सासू म्हणजे आमच्या वऱ्हाडी बोलीत सांगायचे तर पिरपीरी बुढी सदैव टोमणे मारत असते तसे अत्यंत कुजके विधानं करुन धृतराष्ट्राला मैदान मारल्याचा फसवा आनंद मिळत असतो !

हे ही वाचा:

भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक

ठाकरे सरकारमध्ये पुन्हा धुसपूस…हे आहे कारण

पॅलेस्टिन ध्वज फडकविण्याचे आवाहन करणाऱ्याला मौलानाला अटक

ठाकरे सरकार जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना

आज कोरोनाची देशात वाईट अवस्था आहे, यात सिंहाचा वाटा महाराष्ट्राचा आहे. जे काही सावरले ते केंद्र सरकारने. लस केंद्राने दिली. संजय आणि धृतराष्ट्राला अप्रिय असलेल्या उत्तर प्रदेशापेक्षा जास्त लस दिली. व्हेंटिलेटर्स केंद्राने दिले. रेमडीसीविर केंद्राने दिले. ऑक्सिजन केंद्राने दिला. पीपीई किट्स, मास्क, गोळ्या – औषधी, टेस्टिंग किट्स केंद्राने दिल्या. मुख्यमंत्री काय करीत होते ? पहिले सचिन वाझेची नियुक्ती. मग कंगना राणावत, सुशांतसिंग, अर्णव गोस्वामी यांचे बदले. मग उद्योजकांच्या घरावर स्फोटके. मग वाझेला वाचवण्याची धडपड. मग भ्रष्टाचारी मंत्र्यांना वाचवण्याची धडपड. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ एकच शस्त्र आहे, ते म्हणजे मोदी, फडणवीस आणि भाजपा यांचा रोज विरोध करत राहणे. आपले नित्याचे खोटे एक दिवस तरी लोकांना खरे वाटायला लागेल या भाबड्या आशेवर दररोज बिचारे “सामना” खेळतात ! आता यांचे खरे चित्र काय, तर यांच्या हाती फक्त भिकेचा कटोरा आहे.

राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करणाऱयांना उद्धव ठाकरे अँड सत्तालोलुप कंपनी “महाराष्ट्रद्रोही” ठरवणार, याची आम्हाला कल्पना आहे. आता लोकांनाही समजायला लागले आहे. कोमट पाणी, भेंड्या, खाली वर होणाऱ्या लाटा, किंबहुना अशा सर्व शेळपट विधानांना लोक कंटाळले आहेत. त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, याचा त्यांना कायम विसर पडतो. सतत घरातच बसून असल्याने कदाचित असा विस्मरणाचा रोग जडत असावा ! त्यांना आणि संजय राऊतांना काही बाबींचे स्मरण करून द्यावेच लागणार आहे. सत्तेत येण्यापूर्वी बांधावर जाऊन शेतकऱयांना दिलेले वचन तुम्ही विसरलात हे देश पाहतो आहे. हिंदुत्वाचा विसर पडून तुम्ही हिंदूंचा अपमान करणाऱ्या शर्जिल उस्मानीचे रेड कार्पेट वेलकम करता, गेल्या चक्रीवादळात जाहीर केलेली नुकसान भरपाई तुम्ही अजून दिलेली नाही, हे महाराष्ट्राला दिसतंय. मराठा आरक्षणाचे तुम्ही हेतुपुरस्सर तीनतेरा वाजवले, हे न कळण्याइतपत महाराष्ट्र खुळा नाही. प्रचंड वेगवान वादळाला लाजवेल असा विक्रमी वेगवान दौरा महाराष्ट्रासाठी ताजा आहे. गुंडगिरी करणाऱ्या नवाब मलिकांच्या भावाला अटक करण्याची तुमची हिंमत नाही. बंगल्यावर नेऊन भ्याड हल्ला करणाऱ्या मंत्र्याला अटक नाही. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्याला अटक नाही. पण सतरंजी उचल्यांची तक्रार करणाऱ्या भाजपा कार्यकर्ता ऍड. प्रदीप गावडेला अटक करणे हा तुमचा पुरुषार्थ !

जग कोरोना विरुद्ध लढतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधात लढताहेत. यांना कोरोना विरोधात नव्हे तर मोदीजी व भाजपा विरोधात लढायचे आहे.

(लेखक भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आहेत)

Exit mobile version