उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?

नागपूरमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी अभिनंदनासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली की विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या चर्चेसाठी भेट घेतली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदनही केलं. यावेळी, आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे ही उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते.

मात्र, उद्धव ठाकरेंनी अभिनंदनासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली की विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या चर्चेसाठी असा प्रश्न विचारला जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा मिळाल्या आहेत. यात ठाकरे गटाकडे सर्वाधिक २० जागा आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपैकी १० टक्के जागा जिंकणे गरजेचे आहे. मात्र, एकाही पक्षाला २९ जागा जिंकता आलेल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. या पार्श्वभूमीवर ही भेट होती का? असा सवाल चर्चेत आहे. या भेटीनंतर त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली.

हे ही वाचा : 

राहुल गांधींच्या रायबरेलीत ५२ हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे सापडली!

आधी विरोध आता उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही!

भारतात फक्त प्रभू रामाच्याच परंपरा राहतील, बाबर-औरंगजेबच्या नाही!

‘पॅलेस्टाईन’नंतर ‘बांगलादेश’ची बॅग प्रियांका वाड्रांच्या खांद्यावर!

“मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आले त्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत,” असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर म्हटले.

Exit mobile version