दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाकडे पाठ?

दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाकडे पाठ?

बुधवार, २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. फक्त पाच दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच वातावरण तापताना दिसत आहे. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून विरोधक हे सरकारला घेरताना दिसत आहेत. पण या सगळ्यात मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का? हा प्रश्‍न सर्वांनाच पडलेला दिसतो.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अनेक दिवस राज्यकारभारापासून दूर होते. पण आता एकीकडे मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असतानाच मुख्यमंत्री मात्र अधिवेशनाला फिरकताना दिसत नाहीयेत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या चहापानालाही ते अनुपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करत, त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास शक्य होणार नाही म्हणून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबईला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तरी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थिती लावताना दिसत नाहीयेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण तसे घडलेले पाहायला मिळाले नाही. तर आज म्हणजेच गुरुवार, २३ डिसेंबरला अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री गैरहजर राहणार असल्याचे समजत आहे.

हे ही वाचा:

माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी

उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’

मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसेल त्यांनी आपली प्रकृती सुधारेपर्यंत आपला कार्यभार इतर कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणी विरोधी पक्ष करताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी तर थेट रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करा असा सल्ला दिला आहे. तर मुख्यमंत्र्यांची तब्येत ठणठणीत असून लवकरच ते सभागृहात दिसतील असा दावा शिवसेनेच्या गोटातून केला जात आहे. अशातच मुख्यमंत्री सभागृहात केव्हा दिसणार याकडे सध्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.

Exit mobile version