वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला फुले अर्पण करून त्यासमोर ते झुकले त्याविषयावर उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित असताना अद्याप त्यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
वरळी येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या त्या कृतीबद्दल ते मतप्रदर्शन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत गप्प राहणेच पसंत केलेले आहे.
उद्धव ठाकरे सहकुटुंब युरोप दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यामुळे ते महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यात नेहमीचेच गद्दार, खोके या विषयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर शरसंधान याचाच समावेश होता. त्यात निदान ते प्रकाश आंबेडकरांच्या मुद्द्यावर बोलतील अशी अपेक्षा होती पण तो विषय त्यांनी टाळला.
यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा तो पक्ष आहे. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत, त्यामुळे यात आम्ही पडू इच्छित नाही. एकूणच औरंगजेबाच्या मुद्द्यावर कोणतीही विरोधात्मक प्रतिक्रिया देण्याचे उद्धव ठाकरे गटाकडून टाळले जात असल्याचे दिसते आहे.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षांमध्ये मध्यंतरीच युती झालेली आहे. त्यामुळे या युतीत कुठेही मिठाचा खडा पडू नये यासाठी उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर शांत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आंबेडकर यांची कृती ही मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी करण्यात आली आहे. आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका व्यक्त करायला हवी. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये महिला काँग्रेस नेत्यांने केले हिंदुराष्ट्रासाठी आवाहन
स्वस्तिक साईराज-चिरागने रचला इतिहास
गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा पालिकेला अधिकारच काय?
अंबरनाथमध्ये रेल्वे ट्रॅकवरून घसरली; मोठा अनर्थ टळला !
गेल्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री असलेले आदित्य ठाकरे यांना हा विषय माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मागे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली होती. आता औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही ते काहीही बोललेले नाहीत. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा कर्नाटकातील शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्यावरही उद्धव गटाकडून प्रतिक्रिया आली नव्हती.