उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारण तापणार
फेसबुक लाइव्हमध्ये होणारे सरधोपट भाष्य आणि प्रश्नांना थेट न भिडता कसरती करत केली जाणारी वक्तव्ये यांचा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या लोकसत्ताच्या दृष्टि आणि कोन या मुलाखतीत आला. त्यांच्या या मुलाखतीवरूनही आता नव्याने राजकारणात चर्चा रंगणार आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची अजिबात लालसा नसल्याचे विधान त्यांनी केले. ते म्हणाले की, कोरोनाच्या या संकटात कृपा करून राजकारण थांबवा. माझा खरे तर राजकारणाचा पिंड नाही. केवळ वडिलांना मदत करायला मी राजकारणात आलो. त्यामुळे माझे विरोधकांना आवाहन आहे की, राजकारण करू नका. खरे तर, खुर्चीची मला कधीही अभिलाषा नव्हतीच. एक पुत्र कर्तव्य असतं. वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना मी वचन दिलं की तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्रीपदावर बसवेन. मला ध्यानीमनी नसताना मला ही खुर्ची मिळाली, पण हा बहुमान आहे. त्यामुळे या खुर्चीत मला रस नाही. खुर्ची खेचणार असाल तर खेचा. मुद्दा हा आहे की, काम करा, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताच्या दृष्टि आणि कोन या मुलाखतीच्या कार्यक्रमात आपल्याला मुख्यमंत्रीपद स्वप्नातही नसताना मिळाल्याचे सांगितल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात नव्याने चर्चेच्या फेऱ्या झडणार आहेत. आम्हाला मुख्यमंत्रीपद हवे असा शिवसेनेचा दुराग्रह होता आणि त्यातूनच पुढे भाजपा-सेना युतीत मिठाचा खडा पडला. त्याची चर्चा कायम होत असते.
संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेणाऱ्या या मुलाखतीत गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्रात खळबळ उडविणाऱ्या अनेक घटनांचा उल्लेख किंवा त्यासंदर्भातील प्रश्नांना स्पर्शही केल्याचे दिसले नाही. एकूणच आदल्या दिवशी झालेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीत प्रसारमाध्यमे महाविकास आघाडीला ढील देत आहेत, याचा जो उल्लेख केला होता, त्याचीच प्रचिती या मुलाखतीत आली.
हे ही वाचा:
सलग आठव्या महिन्यात जीएसटी महसूल १ लाख कोटींच्या पार
केंद्र सरकारचा ट्विटरला दणका; कायदे मान्य करण्यासाठी शेवटची नोटीस
यशोमती ठाकूर आदित्य ठाकरेंवर का संतापल्या?
मनसुख हिरेनवर विषप्रयोग केला नसल्याचे उघड
भाजप-शिवसेना युती का फुटली, हा नेहमीचा प्रश्न विचारण्यात आल्यावरही त्यातून कोणतेही थेट भाष्य मुख्यमंत्र्यांनी केले नाही. उलट हे दोन पक्ष का वेगळे झाले असतील, असा उलट प्रश्नच त्यांनी केला. कोरोनाच्या आकडेवारीच्या प्रश्नावर राजकारण करू नका म्हणताना राजकारणाची फोडणी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी आपण काहीही लपवत नसल्याचे सांगितले आणि महाराष्ट्रात अशी आकडेवारी लपविली जात नसल्याचेही नमूद केले. तसेच बीडमध्येही मृतदेहाची विटंबना झाली नाही, असे सांगितल्यावर कुबेरांनी जसे उत्तर प्रदेशात नदीत मृतदेह फेकण्यात आले, तसे बीडमध्ये झाले नाही हा संदर्भ दिला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बीडमधील मृतदेहांवर योग्य अंत्यसंस्कार झाले पण नदीत वगैरे टाकण्यात आले नाहीत.
खरे तर, वाझे प्रकरण, अनिल देशमुख, संजय ऱाठोड यांचा राजीनामा, अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांचे प्रकरण, परमबीर यांचा वाद, केंद्र-राज्य सरकार यांच्यातील चढाओढ, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचा वाढता दर, रुग्णालयांकडून होणारी लूट, दहावी-बारावीच्या रद्द झालेल्या परीक्षा अशा अनेक मुद्द्यांवर थेट आणि तेवढेच अडचणीत आणणारे प्रश्न विचारले गेले नाहीत. त्यामुळे एकूणच तुम्ही मारल्यासारखे करा, आम्ही रडल्यासारखे करतो, अशा धाटणीची ही मुलाखत झाली.
महाराष्ट्राच्या या कोरोनाकाळात झालेल्या आर्थिक पीछेहाटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रयत्न सुरू आहेत, असे मोघम उत्तर दिले आणि नंतर ती जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर सोडली. त्यांचीही अशीच मुलाखत घेऊन त्यांच्याकडून हे जाणून घेण्याची विनंतीही केली. उद्योग विभागाचे ते ‘उद्योग’ आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
एरवी केंद्र सरकारवर आसूड ओढणारे गिरीश कुबेर यांचे प्रश्न इथे मात्र बोथट बनल्याचे दिसले. मुख्यमंत्री अडचणीत सापडू नयेत, याची पुरेपूर काळजीही घेतली गेली होती.
विजय वडेट्टीवार यांनी घातलेल्या गोंधळाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेल्याप्रमाणे उत्तर दिले आणि वडेट्टीवार यांची त्यात चूक नव्हती. जर आमच्या कॅबिनेट बैठकीत जे ठरले त्यापेक्षा वेगळे काही वडेट्टीवार बोलले असते तर ती गडबड म्हणता आली असती. त्यांचा गैरसमज झाला. जे ठरले ते केवळ प्रशासनासाठी असलेले निकष होते. पण पारदर्शकता असावी म्हणून आम्ही जनतेलाही ते सांगितले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सफाईने आणि ज्या अधिकारवाणीने भाष्य केले तो सूर मुख्यमंत्र्यांच्या आरक्षणावरील टिप्पणीत दिसला नाही. आता हे सगळे केंद्राच्या हाती आहे आणि राज्याच्या हाती काहीच नाही. त्यामुळे मराठा आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
गेल्या दीड वर्षांत महाविकास आघाडीतील नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांनंतरही आमच्या आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नाहीत. आम्ही सर्व एकमेकांना सहकार्य करत सरकार चालवत आहोत, असाही आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. एकूणच या मुलाखतीच्या कार्यक्रमाचा शेवट मुख्यमंत्र्यांच्या एका खणखणीत मुलाखतीने होईल, अशी अपेक्षा मात्र फोल ठरली.
मुख्यमंत्री ज्या प्रकारे मुलाखतीला सामोरे गेले, ते अपेक्षितच होते.
त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची चाटूगिरी त्यांच्या अनेक पत्रकार टोळी सदस्यांप्रमाणेच दिसून आली. त्यांच्या नजरेपुढे आता राज्यसभेतील खुर्चीच आहे आणि शिवसेनेमध्ये सुद्धा विद्यमान मुख्यमंत्र्याशीवाय अन्य कोणीही लायक व्यक्तीच नसल्याने त्यांना स्वतः खूप मोठा त्याग करून दिवंगत पिताजींना दिलेले वचन पाळावे लागले, त्यात त्यांचा दोष तो कोणता?