महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करताना ‘राहुल गांधीगिरी’ केली आहे. त्यांनी ‘चीन समोर पळे’ असे वक्तव्य करत भारतीय जवानांचा अपमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा आणि संपूर्ण भाषणाचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील भाषणाचे वाभाडे काढले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री साऱ्या जगात फिरले पण महाराष्ट्रात आले नाहीत असा टोला फडणवीस यांनी लगावला. मुख्यमंत्री चीन, अमेरिका, पाकिस्तान, काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, दक्षिणेतील राज्य असे सगळीकडे फिरले पण तासभराच्या भाषणात ते महाराष्ट्रात आले नाहीत असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना चौकातले भाषण आणि सभागृहातील भाषण यातला फरक कळत नाही
मुख्यमंत्री आता नवीन राहिले नाहीत. त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण अजूनही मुख्यमंत्र्यांना चौकातले भाषण आणि सभागृहातले भाषण यातला फरक कळलेला नाही अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली. सभागृहात भाषण करताना मुद्द्यांवर बोलावे लागते पण मुख्यमंत्र्यांकडे मुद्देच नाहीत असे फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकही मुद्दा मांडू शकले नाहीत. शेतकरी अनुदान, वीमा, खोडकीड, बॊंड अळी, वीज तोडणी या कुठल्याच मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांची वीज तोडली पण मुख्यमंत्र्यांना काळजी सिंघू सीमेवरच्या शेतकऱ्यांची असा घणाघात फडणवीसांनी केला.
हे ही पाहा:
मुख्यमंत्र्यांनी केला जवानांचा अपमान
आपल्या सभागृहातील भाषणात चीन समोर पळे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भारतीय जवानांचा अपमान केला आहे. ज्या जवानांनी उणे तीस अंश तापमानत चीनशी लढा दिला आणि भारताची एक इंच भूमीही दिली नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा चीनला एक इंचाही भूमी काबीज करता अली नाही आणि त्यांना माघारी फिरावं लागलं. अशा आमच्या शूर सैनिकांचा जणू ते पळपुटे आहेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अपमान केलाय.
खोटं बोल, पण रेटून बोल
अमित शहा यांच्याबद्दल मुख्यमंत्री जे बोलले ते उसने अवसान आहे. मुख्यमंत्र्यांनी उसने अवसान आणत धडधडीत खोटे विधान केले आहे. त्यांना बंद खोलीत कुठलेही वचन देण्यात आले नव्हते. हे त्यांनाही ठाऊक आहे. पण मुख्यमंत्र्यांनी खोटं बोल पण रेटून बोल असे करत धडधडीत खोटे विधान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
शर्जील उस्मानीच्या केसालाही धक्का लावायची हिंम्मत या सरकारमध्ये नाही
शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेशातला आहे हे मुख्यमंत्री सांगत होते पण त्याची हिंदूंविरोधात बोलायची हिंम्मत उत्तर प्रदेशात होत नाही. तो तुमच्या आमच्या महाराष्ट्रात येऊन पुण्यात येऊन हिंदूंचा अपमान करतो. पण त्याच्या केसालाही धक्का लावायची हिंम्मत या सरकारमध्ये नाही. असा पलटवार फडणवीसांनी केला.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसणारे मुख्यमंत्री
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरेंनी भारतरत्नचा मुद्दा काढला होता. पण त्यावरूनही फडणवीसांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. एकवेळ स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न नाही मिळाला तरी चालेल. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे, त्यांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून मुख्यमंत्री बसल्येत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
इतिहासाची माहिती नसताना राजकीय भाषण
मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की शिवसेना स्वातंत्र्य संग्रामात कुठेच नव्हती. पण संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान होते. पण इतिहासाची माहिती नसताना मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय भाषण केल्याचा आक्षेप फडणवीस यांनी घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मुद्दे असतील तर त्यावर चर्चा होते पण मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणात मुद्देच नव्हते. आजवर सभागृहात एवढे सुमार मुख्यमंत्र्यांचे भाषण कधीही झाले नव्हते असा टोलाही फडणवीसांनी लगावला.