बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्राकडे बोट

परिस्थिती १५ दिवस जैसे थेच राहणार

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा तर रद्द केल्या पण १२वीच्या परीक्षांबाबत निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी कोणती पद्धत ठेवता येईल याचा आढावा घेत आहोत. असे एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले, पण त्याचवेळी यासंदर्भात केंद्राने निर्णय घ्यायला हवा, असेही त्यांनी नमूद करत पुन्हा एकदा केंद्राकडूनच या निर्णयाबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे. बारावीचा निर्णय देशभर सारखाच पाहिजे, यावर केंद्राने धोरण तयार करावे, शिक्षणाच्या बाबतीत क्रांतिकारक निर्णय घ्यायला हवा असे सांगून केंद्रावर ही गोष्ट ढकलली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षांचा मुद्दा खूप गंभीर बनत चालला आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच

रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन १५ दिवस वाढवत असल्याचे जाहीर केले. काही जिल्ह्यांत निर्बंध वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती जैसे थेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. विषाणूचा नवा अवतार बघून निर्बंध कडक करावे लागणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. म्हणजे व्यापाऱ्यांना अजूनही दिलासा मिळणार नाही, हे स्पष्ट झाले. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासंदर्भात काही विचार करावा, अशी मागणी केली होती, पण त्यांना या फेसबुक लाइव्हमधून दिलासा मिळालेला नाही. एकूणच आणखी १५ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडली जाणार नाहीत हे स्पष्ट दिसते आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन

सात वर्षे स्वच्छतेची… मोदी है तो मुमकिन है

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने तारांबळ

आधीच ‘उल्हास’; त्यात उशिरा आली जाग

धावता दौरा केला

कोकणात तौक्ते वादळामुळे मोठे नुकसान झाले असले तरी हे वादळ कोकणाला स्पर्शून गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपण धावता दौरा केल्याचीही कबुली दिली. ते पुढे म्हणाले की, शिक्षण सुरु ठेवले पाहिजे. त्यावर निर्णय घेत आहोत. वर्क फ्रॉम होम सारखं शिक्षणाचं करता येईल, का या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहोत. तिसऱ्या लाटेवर चर्चा करताना मी उद्योगपतींशी चर्चा केली होती. अर्थचक्र फिरतं राहिलं पाहिजे. तसंच शिक्षणाच्या बाबतीत झालं पाहिजे. आपल्याला कोविडसोबत राहायचं नाही तर त्यावर मात करायची आहे, असे पूर्वीच्या फेसबुक लाइव्हप्रमाणेच मुख्यमंत्री पुन्हा म्हणाले पण त्यातून नेमके धोरण काय याचा उलगडा होऊ शकला नाही.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणाला वादळ स्पर्शून गेलं. ही नवी दुष्ट चक्रीवादळं आदळू लागली आहेत. कोरोनाचं संकट त्यात हे वादळ ही फार पंचाईत. आपल्या प्रशासनानं छान काम केलं. द्यायचा तो फटका दिलाच. मी धावता दौरा केला. हे वादळ येण्याआधी मी माहिती घेत होतो. जोर किती होता यावर लक्ष ठेवून होतो. नुकसान किती झालं याची मी पाहणी केली, झाडं पडली होती, वीज पुरवठा खंडित झाला होता, नुकसान भरपाईची घोषणा केली, प्रत्यक्ष द्यायची सुरुवात झाली. पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीत सांगितले की, अशी आपत्ती आली की केंद्राच्या निकषांप्रमाणे ते करतात. ते निकष बदलावे अशी मी मागणी केली. तरी निसर्ग वादळाच्या मदतीचे जे निकष होते, तशीच मदत देऊ. संकटे वारंवार येत असतील तर काहीठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागेल. धूपप्रतिबंधक बंधारे, वीजपुरवठा खंडित होतो अशावेळी भूमिगत तारा बसवण्याला प्राधान्य, भूकंपरोधक घरे, वस्त्या हलवाव्या लागतात त्यामुळे पक्के निवारे बांधण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीची माहितीही यावेळी दिली.अन्नसुरक्षा २ लाख ७४ हजार मेट्रीक टन धान्य वितरण, ५५ लाख शिवभोजन थाळ्या, ८५० कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा निवृत्ती वेतन, १० लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी १५४ कोटी ९५ लाख बँक खात्यात जमा केले, असे ते म्हणाले. न डगमगता संकटात सुरक्षित राहावा महाराष्ट्र म्हणून ही पावले उचलली. जनतेवर निर्बंध घालणे पटत नाही. यासारखे कटू काम करावे लागू नये पण नाईलाजाने करावे लागते आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब केले.

 

Exit mobile version