उद्धव ठाकरे यांना अजूनही आपले मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे झालेले दुःख लपवता आलेले नाही. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनातील हे दुःख बोलून दाखविले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात. होय शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे आजही तेच सांगतो आहे. फक्त आपली निशाणी बदलली आहे. निशाणी बदलल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. सर्वेमध्येही लोकांच्या मनातील मुख्यमंत्री येणार असे म्हटले जात होते. मग आपली दांडी कशी उडाली?
उद्धव ठाकरे यांनी आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे, याचा प्रत्यय त्यांच्या या भाषणातून आला. मातोश्रीतून त्यांनी हे भाषण केले. ते म्हणाले की, जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर सगळे येतात. ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. यांनी (भाजपा) संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे. एक है तो सेफ है म्हणत आहेत. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का?
हे ही वाचा:
हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!
संभल हिंसाचार: पत्रकार असण्याचा खोटा दावा करणाऱ्या असीम रझा झैदीला अटक
शरद पवार महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत!
प्रशासनाने निवडणूक घ्यावी, आम्ही तयार आहोत!
ते म्हणाले की, असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत, जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जाते आहे. अशा वेळी आपण षंढ म्हणून हे बघत बसणार का? तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात नाही.
उद्धव ठाकरेंनी ही सत्ता उलथवून टाकावी लागेल, असे आवाहन उपस्थितांना केले. ते म्हणाले की, आता आपल्याला झोपून चालणार नाही, कारण हे सगळं चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे. हे राज्य आता आपल्याला उलथवून टाकावं लागेल. एक ठिणगी तर पडली आहे. हा मुंबईच्या मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. जिथे तुम्हाला मदत लागेल तिथे तुमच्या बरोबर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा असेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.